नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून उत्सवाचे रंग आतापासूनच वातावरणात भरू लागले आहेत. दांडिया आणि रास गरब्यासाठीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडाली आहे. सुंदर नक्षीकाम केलेले आकर्षक घागरे, चनिया चोली, साडय़ा आणि कवडय़ा, मणी यांचा वापर करून दागिन्यांनी बाजार फुलला आहे.
दांडियानिमित्ताने वाशी सेक्टर ९मधील कापड बाजार व एपीएमसीच्या आवारातील बाजार सजला आहे. नवरात्रीसाठी खास तयार केलेले बांधणीचे कपडे, राजस्थान, मेवाड, बडोदा, सुरत, मध्य प्रदेश येथील कारागीर आणि विक्रेते नवी मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. गरबा-दांडिया खेळण्यासाठी वेशभूषेचा महत्त्वाचा भाग असलेल्या राजस्थानी घागऱ्याला विशेष मागणी असून त्यात सुंदर नक्षीकाम असलेले घागरे, साडय़ा, चनिया चोली, धोती कुर्त्यांकडे तरुणाईचा कल अधिक आहे. खास राजस्थानी स्टाइल कुर्त्यांनाही अधिक मागणी आहे. तसेच पारंपरिक गुजराती, मारवाडी पद्धतीचे कपडे बाजारात सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. या कपडय़ांच्या किमती १००० रुपयांपासून सुरू होत आहेत, तसेच भाडय़ाने कपडे घेण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
उपवासाचे पदार्थ
नवरात्रीमध्ये उपवास करून आदिशक्तीची आराधना करतात. त्यासाठी बाजारात उपवासाचे पदार्थ दाखल झाले असून केळी, बटाटा, रताळ्याचे वेफर्स वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळत असून राजगिराचे लाडू, चिक्कीदेखील बाजारात उपलब्ध आहे.
चनिया चोलीला मागणी
रंगीबेरंगी चनिया चोली बाजारात सर्वाचेच लक्ष वेधून घेत असून लाल, पिवळ्या, निळ्या, तसेच काळ्या, हिरव्या अशा विविध रंगांच्या चनिया चोली आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. कच्छी भरतकाम केलेल्या चनिया चोली सर्व वयोगटांतील महिला वर्गासाठी उपलब्ध असून मिरर वर्क, बॉर्डर स्टाइल, गोटा वर्क अशी विविध कारागिरी केलेल्या चनिया चोलीलासुद्धा मागणी आहे. साधारणत: १००० रुपयांपासून २५ हजारांपर्यंत चनिया चोली बाजारात उपलब्ध आहे.

क्रेझ टॅटूची
नवरात्रीच्या फॅशन टॅटूमेकिंगची मोठी क्रेझ तरुणाईमध्ये आहे. त्यात कपल्स, दांडिया रास, देवीचा चेहरा किंवा अ‍ॅब्स्टॅक्ट टॅटूला अधिक मागणी आहे. टॅटू काढण्याचे दोन प्रकार असून एक कायमस्वरूपी तर दुसरा तात्पुरता. यंदा टॅटूचे दरही काहीसे वाढले असून २ हजार रुपयांपासून ते अगदी ५० हजारांपर्यंतचा समावेश आहे.