संक्रांतीच्या सणासाठी महिलांची बाजारात रेलचेल वाढली आहे. संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत विक्रीस दाखल झाल्या आहेत. त्यात १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत वस्तू उपलब्ध आहेत. संक्रांतीचा सण हा प्रत्येक जण वेगळ्याच उत्साहात साजरा करीत असतो. प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत असतानाच काही महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्यात येते. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. अनेक घरांतील महिला संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. त्यात लहान वस्तू- ज्या घरात उपयोगी येणाऱ्या किंवा महिलांच्या कामास येणाऱ्या असतात. तसेच कोणी हातरुमलाबरोबर गजरा, तर कोणी प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये तिळगूळ घालून देतात.
संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत. त्यात ज्वेलरी बॉक्स, छोटय़ा पर्सेस, मोबाइल कव्हर या प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.

संक्रांतीच्या साहित्यात वाढ
संक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध आवश्यक साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून बाजरी, बाजरीचे पीठ, तीळ, तिळगूळ, तिळाच्या वडय़ा, पांढरे तीळ, गूळ यांच्या किमतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली असून बाजरी २० रु. किलो, बाजरीचे पीठ २६ रुपये किलो, साखर ३० रुपये, तीळ १२० ते १६० रुपये किलो, गूळ ३६ रुपये किलो, तिळगूळ ४० ते ५० रुपये किलो असा दर आहे. मागील वर्षांच्या तुलनेत साखर स्वस्त झाली आहे. त्यामुळे साखरेचे पदार्थ व गुळाचे पदार्थ बनविण्याकडे महिला वर्गाचा कल वाढू लागला आहे. साखरेचे तिळगूळ, काटेरी तिळगूळ, खसखसी तिळगूळ, बडीशेपचे तिळगूळ, चुरमुरेचे तिळगूळ, लवंग तिळगूळ, कलिंग तिळगूळ, दालचिनी तिळगूळ, मोत्याचे तिळगूळ अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी तिळगुळांनी वातावरणात गोडवा निर्माण झाला आहे.

भोगीसाठी बाजारात भाज्या
भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या मार्केटमध्ये उपलब्ध असून गाजर, मेरुल्या, छोले, मटार, वाटाणा, हरभरा, वांगी, बटाटा, लाल भाजी यामध्ये काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. गाजर ३० ते ३५ रुपये किलो, छोले २० रुपये, मटार ४० ते ६० रुपये किलो, वाटाणा ८० रुपये किलो, हरभरा १० रुपये पेंढी, वांगी ३० रुपये किलो, बटाटा ३० रुपये किलो.

दुकानात वाणासाठी उपलब्ध वस्तू
प्लास्टिक वस्तू १० ते ५० रुपये
ज्वेलरी बॉक्स ३० ते ६० रुपये
बास्केट ३५ ते ७० रुपये
फोल्डिंग बॅग्ज ६० रुपये
मोबाइल कव्हर २० ते ५० रुपये