नेत्रदीपक आकाशकंदील.. आकर्षक पणत्या.. फटाक्यांचे नवनवीन प्रकार.. पूजा साहित्याचे विशेष ‘कीट’.. खतावणी व रोजमेळच्या वह्या.. दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर असे साहित्य खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी एकाच छताखाली फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्याचे विशेष दीपावली कीट उपलब्ध करून दिले आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी तसेच शहरांमध्येही कामगार वर्ग तसेच शासकीय नोकरदारांच्या हाती वेळेवर बोनस पडल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेतील खरेदी-विक्रीवर झाला आहे. या सर्वाचा एकत्रित उत्साह सध्या बाजारपेठेत पाहावयास मिळतो. महागाईची काहीशी ओरड असली तरी खरेदीवर त्याचा कोणताच परिणाम झाला नसल्याने व्यावसायिक खूश आहेत. दिवाळीचे मुख्य आकर्षण असणारे आकाशकंदीलाचे अनेक प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यंदा चिनी मालाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून पर्यावरणस्नेही विशेषत: ‘हॅण्डमेड पेपर’ तसेच कापडी आकाशकंदीलला विशेष मागणी आहे. या शिवाय सजावटीसाठी वापरण्यात येणारे लहान आकारातील आकाश दिव्यांच्या माळांची साधारणत: ६० रु पये डझन या दराने विक्री होत आहे. लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्य़ा, बत्तासे हे साहित्य २० रुपयांपासून पुढे आहे. अभ्यंगस्नानासाठी आवश्यक उटणे, सुगंधी तेलाची काही खास उत्पादने बाजारात आली आहेत. पणत्यांमध्ये नेहमीच्या मातीच्या साध्या पणत्यांसोबत कुंदन वर्क, रंगीत, टिकली वर्क, सिरॅमिक वर्क असणाऱ्या पणत्या, मेणाच्या जेल, फ्लोटिंग, सुगंधी असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. कोकण परिसरातून आलेले खास ‘मॅजिक लॅम्प’ उपलब्ध आहे.
आजच्या संगणकीय युगात पारंपरिक खतावणी व रोजमेळ, रोजनिशी आपले महत्त्व अबाधित राखून आहेत. अगदी तळहाताच्या आकारातील खतावण्यांपासून ‘ए-४’ आकारातील रोजमेळा, खतावण्या बाजारात उपलब्ध आहेत. सगळीकडे संगणकीकरण झाल्याने खतावणी, रोजमेळीला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद आहे. मात्र दिवाळीच्या तीन ते चार दिवसात विशेष: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किमान पूजेसाठी व्यापाऱ्यांकडून खतावणी वा रोजमेळी खरेदी केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नव्या वर्षांसाठी बाजारात विविध प्रकारच्या रोजनिशी या ३० रुपयांपासून दीड हजारापर्यंत उपलब्ध आहेत. दैनंदिन कामाच्या नियोजनासाठीच्या ‘प्लानर’साठी वेगवेगळ्या आकाराचे पर्याय आहेत.
वेगवेगळ्या वस्तू खरेदी करताना गोंधळ होऊ नये म्हणून सर्व साहित्य एकत्रित स्वरूपात उपलब्ध करणारे खास ‘दीपावली कीट’ बाजारात उपलब्ध आहेत. त्यात वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत लागणारे साहित्य, सकाळी आंघोळीसाठी लागणारे सुगंधी उटणे, साबण, सुवासिक तेल, लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक हळदीकुंकू, अक्षतासह लाह्या, बत्तासे, अत्तर अशा एकूण २६ वस्तूंचा समावेश आहे. कपडे खरेदीलाही उधाण आले आहे. विविध मालिकांमधील नायिकांच्या साडय़ांची ‘क्रेझ’ महिला वर्गात दिसून येते. दुसरीकडे महिलांसाठी सहा वार, तसेच नववार तयार साडय़ा ८०० – १५०० रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बच्चे कंपनी छोटा भीम, अ‍ॅंग्री बर्ड, बॅनटेन, डोरोमनशी साधम्र्य साधणाऱ्या कपडय़ांची पसंती करत आहे. ठिकठिकाणी वेगवेगळे सेल लागले असून शहराची मुख्य बाजारपेठ असणारे मेनरोड, वेगवेगळ्या भागातील मॉल्स व छोटी-मोठी दुकाने गर्दीने फुलून गेली आहेत. या एकूणच वातावरणाने बाजारपेठ दिवाळीमय झाल्याचे दिसत आहे.

फटाक्यांच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ
यंदा फटाक्यांच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली असून चिनी फटाक्यांवर विक्रेत्यांनी आधीपासून घातलेला बहिष्कार यंदाही कायम राहणार आहे. फारसा आवाज न करणारे प्रदूषणविरहित फटाके खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. फटाक्यांमुळे ध्वनी व हवेतील प्रदूषणाबाबत कितीही ओरड होत असली तरी खरेदीच्या उत्साहाला कोणताही ‘ब्रेक’ लागत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. फ्लॉवरपॉट, भुईचक्र, रॉकेट, लेस अशा पारंपरिक प्रकारांसोबत सिग्नल लाईट, कलर फ्लॅश, माईन ऑफ क्रॅकर्स, व्हीसल व्हीज, ट्रीपल फन, ब्रेक डान्स, पिकॉक डान्स, ओह ला ला अशा विविध फॅन्सी प्रकारांचा समावेश आहे. आवाजाच्या फटाक्यांपेक्षा फॅन्सी प्रकारच्या फटाक्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. व्यापारी वर्गाचा कल माळा खरेदीकडे असून एक हजारापासून ते १० हजारांपर्यंतच्या माळांना चांगली मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत फटाक्यांच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याची माहिती नाशिक फटाका असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली. कच्चा मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे फटाक्यांचे भाव यंदा काहीसे वाढले आहेत. नभांगण प्रकाशाने व्यापणाऱ्या फटाक्यांना बच्चे कंपनीची विशेष पसंती मिळत आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी कमी आवाजाचे व पर्यावरणपूरक अर्थात प्रकाशझोत फेकणाऱ्या संगीतमय फटाक्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात म्युझिकल बटरफ्लाय, रिमझिम असे प्रकार सर्वाचे लक्ष वेधत आहे. सुटय़ा स्वरूपात फटाके खरेदी केल्यास ते काहीसे महाग वाटतात. यामुळे फटाक्यांचा एकत्रित समावेश असलेले ‘गिफ्ट पॅक’ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अगदी २०० रुपयांपासून ते ३५०० रुपयांपर्यंत फटाक्यांचे ‘गिफ्ट पॅक’ उपलब्ध आहेत. टिकल्या फोडण्यासाठी नेहमीच्या पारंपरिक बंदुकीसोबत ‘एके ४७’ ही नवी बंदूकही बाजारात दाखल झाली आहे. तिची किंमत दीड ते दोन हजार रुपयांच्या घरात असल्याने आणि कुटुंबीयांकडून ही मागणी पूर्ण होण्यासारखी नसल्याने बच्चे कंपनीनी तिचे दूर दर्शन घेण्यात समाधान मानले आहे. काही फटाक्यांच्या नावात बदल झाला असल्याचे जातेगावकर यांनी सांगितले.