मुंबईतील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या मरोशी ते रुपारेल या १२.४ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा बोगदा सुरू झाल्यानंतर धरणांमधून येणारे पाणी विमानतळ आणि माहीमच्या खाडीखालून जाणाऱ्या या बोगद्यातून मुंबईकरांच्या घरात पोहोचणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जलबोगद्यामुळे पाणीचोरीला आळा बसणार आहे.
भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून पश्चिम उपनगरे आणि शहराच्या वायव्य भागात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी मरोशी ते रुपारेल जलबोगद्याचा प्रकल्प जवाहरलाल नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत २००७ मध्ये हाती घेण्यात आला. सध्या वैतरणा, तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम या प्रमुख जलवाहिन्या विमानतळाखालून जातात. आता सुरक्षेच्या कारणास्तव या जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती कठीण होऊन बसली आहे. शिवाय अतिक्रमणांमुळे या जलवाहिन्यांमधून मोठय़ा प्रमाणात पाणीचोरी होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी या जलबोगद्याचे काम हाती घेण्यात आले होते.
मरोशी-रुपारेल जलबोगद्याचे काम मरोशी ते वाकोला (५.८३ किमी), वाकोला-माहीम (४.५५ किमी) आणि माहीम-रुपारेल (१.८६ किमी) या तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे हा जलबोगदा बांधणीचे काम करत असलेल्या ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’कडून सांगण्यात आले. हा जलबोगदा जमिनीखाली ७० मीटर खोलीवरून जातो. काँक्रीटचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत असल्याने त्याच्या देखभाल दुरुस्तीचा फारसा प्रश्न येणार नाही.
मरोशी, वाकोला आणि माहीम येथे हा जलबोगदा भूपृष्ठाशी जोडण्यात आला आहे. त्यासाठी १२ मीटर व्यास आणि ७० ते ८० मीटर खोल असे विहिरीसारखे (सुमारे २२ मजली इमारतीएवढे!) बांधकाम करण्यात आले असून त्यातून जलबोगद्यात उतरता येईल. रुपारेल ते मलबार हिलपर्यंतचा जलबोगदा यापूर्वीच बांधण्यात आलेला असून त्या बोगद्याला हा नवीन जलबोगदा रुपारेल येथे जोडला जाईल.
प्रकल्पाची वैशिष्टय़े
*पाण्याच्या चोरीला आळा बसून पाण्याची मोठी बचत होईल
*जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा अत्यंत कटकटीचा प्रश्न सुटेल
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 8:42 am