नव-याची जळती बिडी, उंदरा-मांजराची लुडबूड एका विवाहित तरुणीच्या जिवावर उठली. गुरुवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत औद्योगिक वसाहतीनजीक असणाऱ्या सावळीत विवाहित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नीता केदार चौहान ही १९ वर्षांची विवाहिता सावळी येथील भाडय़ाच्या घरात पतीसह राहाते. मूळचे ग्वाल्हेरचे असणारे हे कुटुंब गेल्या एक वर्षांपासून सावळीत राहात आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे पती-पत्नी एकत्र झोपी गेले होते.  मध्यरात्रीनंतर पती केदार चौहान हा उठला. रात्रीच्या वेळी त्याने तलफ झाल्याने बिडी पेटविली.  नित्याप्रमाणे अंथरुणाच्या कडेला जमिनीवरच बिडी विझविली. मात्र ती बिडी पूर्ण विझलेली नव्हती.    
याच दरम्यान फळीवर ठेवण्यात आलेली रॉकेलची बाटली त्या विस्तवावर पडली. काही समजण्याच्या आत अंथरुणावर झोपलेल्या तरुणीच्या अंगावरील कपडय़ांनी पेट घेतला. तरुणी या दुर्घटनेत ५५ टक्के भाजली असून तिला पतीने सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.