विवाहितेच्या भोळसट स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये दोन महिलांचाही समावेश असून त्यांनी आरोपींना विवाहितेबाबत माहिती दिली होती. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यातील पाच संशयितांना पोलीस कोठडी तर दोन महिलांची न्यायालयीन कोठडी रवानगी केली.
या प्रकरणी विवाहितेच्या पतीने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तालुक्यातील बाभुळगाव येथे वास्तव्यास असणारे हे दांपत्य पुण्यातील चाकण परिसरात वास्तव्यास आहे. पती कारखान्यात नोकरीला असल्याने ते अधुनमधून शेतीच्या कामासाठी गावी ये-जा
करत असत. याच दरम्यान विवाहितेच्या भोळसटपणाचा संशयितांनी गैरफायदा घेतला.
उषा मिसाळ व रत्ना हिरणवाळे यांना विवाहितेच्या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्याबाबतची माहिती नाना गंगाराम औशीकर यांना दिली. मग, औशीकर याने विवाहितेच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तिला धमकावून बलात्कार केला. त्यानंतर भगवंत मोहन काटकर, सुखदेव रतन गायकवाड, भिका चिमण औशीकर, रवींद्र वाघ यांनीही याच पद्धतीने विवाहितेवर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ज्या ज्या वेळी ही महिला गावाकडे येत असे, त्यावेळी संबंधितांकडून या पद्धतीने बलात्कार करण्यात आला.
गंगाराम औशीकरने तर या विवाहितेवर दररोज भ्रमणध्वनी करण्यासाठी दबाव टाकला. विवाहितेकडून या संपूर्ण प्रकाराची माहिती समजल्यानंतर पतीने नांदगाव पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी रवींद्र वाघ वगळता सर्व संशयितांना लगेच अटक केली.
मंगळवारी त्यांना न्यायालयसमोर उभे करण्यात आले. त्यातील नाना औशीकर, भगवंत काटकर, सुखदेव गायकवाड, भिका औशीकर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर मिसाळ व हिरणवाळे या महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.