म्हशी खरेदी करण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा सासरी मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. सासरच्या लोकांच्या छळास कंटाळून या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी तिच्या पतीसह दहाजणांवर गुन्हा दाखल केला.
अंजुम बेगम साजेद खान (वय २५, काजीवाडी, भडकलगेट) असे या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील शेख शरीफ शेख रशीद (वय ५०, शाहूनगर, मारुती मंदिराजवळ, तालुका व जिल्हा जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली. ऑगस्ट २००६पासून गेल्या ३१ ऑक्टोबर दरम्यान आरोपी साजेद खान साहेब खान (काजीवाडा, औरंगाबाद), रजिया खान साहेबखान, साहेबखान (पूर्ण नाव माहीत नाही), माजिद खान साहेबखान, फातेमाबी माजेदखान, रफिकाबी फारूख (बुढ्ढीलाईन), रईसाबी मुशातक (रशीदपुरा), गुड्डी मजहर (बुढ्ढीलाईन), मुश्ताक (पूर्ण नाव माहीत नाही, रशीदपुरा) व फारूख (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी अंजुम हिचा म्हशी घेण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये आणावेत, यासाठी सतत त्रास देऊन मानसिक व शारीरिक छळ केला, तसेच शिवीगाळ केली. तू मरत का नाहीस, लवकर मर असे म्हणून वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केले. सासरच्या या त्रासाला कंटाळून अंजुमने आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हय़ाची नोंद केली.