जागा खरेदी करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून सासरच्या लोकांनी धमकी दिली. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध एम वाळूज पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद केली.
देवका सुनील गादेकर (वय २७, पळसखेडे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव) हिने पोलिसात तक्रार दिली. फेब्रुवारी २००५ ते मार्च २०१३ दरम्यान दत्तानगर, रांजणगाव येथे आरोपी पती सुनील मोतीराम गादेकर (वय २७, शिवण, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा वाशीम), सासरा मोतीराम एकनाथ गादेकर, सासू सुमित्रा मोतीराम गादेकर, तसेच ज्योती गुलाबराव पांडिळे यांनी संगनमत करून देवका हिचा सासरी असताना माहेराहून वरील कारणासाठी पैसे घेऊन यावेत, यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन चापटीने मारहाण केली. तू आई-वडिलांची एकुलती मुलगी आहेस, असे म्हणून माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये, यासाठी तिचा छळ केला व धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा
घरी स्वयंपाककामास असलेल्या तरुणीने दाम्पत्याकडील रोख ६० हजार रुपये रक्कम चोरून नेल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. रवि भास्कर वट्टमवार (वय ४२, उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली. गेल्या १ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी ३ दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादीच्या घरी आरोपी विद्या देविदास देवडे (वय १९, फुलेनगर, औरंगाबाद) स्वयंपाककामाला येत असे. फिर्यादीच्या पत्नीचे बेडरूममधील कपाटातून ३० हजार रुपये व फिर्यादीच्या कपाटातून ३० हजार असे ६० हजार रुपये तिने लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.