दुर्दशा झालेले डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान सुशोभीकरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या लालफितीच्या कारभारात सापडला आहे. विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दोन महिन्यांपूर्वी यासंबंधी सविस्तर प्रस्ताव महापालिकेस सादर केला आहे. मात्र, प्रशासनाने तो लालफितीच्या कारभारात अडकवून ठेवला आहे.
डोंबिवली शहराच्या प्रवेशद्वारावरील सचान स्मारक तसेच स्फूर्ती स्थळ गॅलरीची खूप दुर्दशा झाली आहे. ३५ लाख खर्च करून बांधलेल्या या उपक्रमांकडे पाहण्यास महापालिकेला वेळ नाही. सचान स्मारक, स्फूर्ती स्थळ, तेथील उद्यानाचा आडोसा घेऊन अनेक प्रेमीयुगले या स्मारकाला सकाळी आणि संध्याकाळी विळखा टाकून बसलेली असतात. मद्यपी, भिकारी आजूबाजूला पहुडलेले असतात. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, त्याची देखभाल करणे गरजेचे असताना महापालिकेचा एकही कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक तेथे नसतो. दोन महिन्यांपूर्वी या स्मारक, स्फूर्ती स्थळाची दुर्दशा पाहून विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी महापालिका आयुक्त शंकर भिसे, महापौर कल्याणी पाटील यांना एक पत्र देऊन स्वखर्चाने सचान स्मारक, स्फूर्ती स्थळ, लगतच्या उद्यानाची शाळा व्यवस्थापन देखभाल करण्यात येईल असे पत्र दिले आहे. यासाठी उपमहापौर राहुल दामले यांनीही पुढाकार घेऊन प्रशानाने जलदगतीने हा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून आयुक्तांकडे पाठपुरावा केला. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्याप तरी या प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. याविषयी विवेक पंडित यांनीही नाराजी व्यक्त केली असून परीक्षा संपल्यानंतर शाळेची मुले घेऊन दर पंधरा दिवस, महिन्यांनी स्मारक परिसराची स्वच्छता करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेचे मनसेचे विरोधी पक्षनेते, डोंबिवलीतील सर्व पक्षीय २२ नगरसेवक दररोज याच रस्त्यावरून येजा करतात. त्यांनाही ही दुर्दशा दिसत नाही. प्रेरणादायी ठरणाऱ्या स्मारकाचा विषय कधी सर्वसाधारण सभेत चर्चेलाही आलेला नाही. याबाबत पालिकेच्या मालमत्ता विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, उद्यान विभागातर्फे हे स्मारक सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल.