जातिनिहाय जनगणनेच्या सर्वेक्षणाचे गेल्या दोन वर्षांपासून मानधन न मिळाल्याने माध्यमिक महिला शिक्षक व माध्यमिक शिक्षक भारती संघटनेने बुधवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात तोंडाला काळय़ा फिती लावून आत्मक्लेश आंदोलन केले. शिक्षकांच्या कामाचे प्रलंबित मानधन नोव्हेंबरअखेर त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. वसंतराव गारुडकर यांनी दिले.
संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आशा मगर, विभावरी रोकडे, कल्पना काळोखे, सुनीता घंगाळे आदींनी केले. जातिनिहाय जनगणनेचे काम नोव्हेंबर २०११ ते मे २०१२ दरम्यान झाले. त्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांना ४५ दिवसांचा कालावधी दिला गेला होता. त्यासाठी २ हजार १३९ प्रगणक, ३५१ पर्यवेक्षक, ६१ मास्टर ट्रेनर व राखीव असे २ हजार ७३७ शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. प्रगणकांना १८ हजार रु. व पर्यवेक्षकांना २४ हजार रु. मिळावयास हवे होते. एकूण ५ कोटी ९१ लाख खर्च अपेक्षित होता. परंतु त्यातील प्रगणकाचे ६ हजार व पर्यवेक्षक ८ हजार रुपयांपासून वंचित आहेत. अशी एकूण १ कोटी २० लाख रुपयांपासून जिल्हय़ातील शिक्षक वंचित आहेत, याकडे संघटनेच्या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
काही त्रुटी आहेत व प्रारूप यादी जाहीर होणे बाकी आहे, याकडे डॉ. गारुडकर यांनी लक्ष वेधले. त्यावर मगर यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षकांचे काम संपले आहे. आपल्या कार्यालयाचे काम बाकी आहे, असे स्पष्ट केले.
आंदोलनात जान्हवी नरसाळे, बेबीनंदा लांडे, संध्या गावडे, बाबासाहेब लोंढे, सुनील गाडगे, अजय बारगळ, अशोक धनवडे, प्रशांत कुलकर्णी, बापूसाहेब गायकवाड, सचिन घोडे, महादेव साबळे, रंगनाथ मोटे आदी सहभागी झाले होते.