केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने कामगार कायद्यात कामगारविरोधी बदल केल्याने माथाडी कामगार वर्गात संतापाची लाट पसरली आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील माथाडी कामगारांनी सोमवार, १६ मार्च रोजी एकदिवसीय राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ व इतर संघटनांनी हा राज्यव्यापी बंद पुकारला आहे.
भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर माथाडींच्या नावाने गुंडगिरी करणाऱ्यांचा बदोबस्त करण्याचा आव आणून माथाडी कामगार कायदा बदलण्याचा प्रकार सुरू केला आहे, असा आरोप माथाडी कामगारांकडून करण्यात येत आहे.
कायद्यातील या बदलामुळे माथाडी, मापाडी त्याचबरोबर विविध अस्थापनांतील कामगारांवर अन्याय होणार आहे, अशी भावना याप्रसंगी कामगार नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केली आहे. ४१ वर्षांपासून असणारा कायदा बदलून सरकार माथाडी व इतर संघटित कामगारांना नामशेष करणार असून, त्याचा निषेध करण्यासाठी हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.
कष्टकरी कामगारांना पेन्शन योजना द्यावी़  माथाडी सल्लागार मंडळाची पुनर्रचना करून अनुभवी कामगार नेत्यांची नेमणूक करावी. बाजारसमितीचे नियमन कायम ठेवावे. फॅक्टरी व्यवसायातून माथाडी कामगारांना वगळू नये, त्याचबरोबर कामगार कायद्यात कामगार हिताय दुरुस्ती कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. वाशी येथील माथाडी भवनात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात माथाडी कामगार कायद्यात सरकारने केलेल्या बदलांचा निषेध करण्यात आला.
राज्यभरातील बाजारपेठा, कंपनी, कारखाने, एपीएमसीतील बाजारपेठा, रेल्वे धक्का, येथे काम करणाऱ्या हजारो माथाडी कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न वेधल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.