घामाच्या धारांनी वैतागलेल्या मुंबईकरांना शनिवार-रविवारची सुट्टी साधून एखाद्या थंड आणि शांत जागी पळ काढण्याजोग्या मोजक्या जागांमध्ये माथेरानचा समावेश होतो. पण रविवारी ऐन गर्दीच्या वेळेस नेरळहून माथेरानला जाणारी गाडी अचानकपणे जुम्मापट्टी स्थाकावरून उलटा प्रवास करू लागली. यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. मुंबईच्या लगतच असलेले आणि खिशाला परवडेल अशा दृष्टीने सोयीच्या असलेल्या पर्यटन क्षेत्रामध्ये माथेरानचा समावेश होतो. शनिवार-रविवारच्या छोटय़ा सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत मुंबईकर माथेरानला जायच्या योजना बनवू लागतात. त्यात नेरळ ते माथेरान हा प्रवास करताना निसर्गाच्या कुशीतून जाणारी ट्रेन म्हणजे बच्चेकंपनीसोबत सर्वाची लाडकी आहे. रविवारी दुपारी १२.५८च्या दरम्यान या ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड आला आणि त्यामुळे ऐरवी कुतूहलाचा विषय असलेल्या या ट्रेनने प्रवाशांच्या मनात धडकी भरली होती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जुम्मापट्टी स्थानकाजवळ ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड आला आणि ट्रेन मागे जाऊ लागली. एका अडथळ्यामुळे ट्रेन रुळावर थांबल्यामुळे ती दरीत कलंडण्यापासून वाचली. नंतर समोरच्या बाजूने माथेरानवरून येणाऱ्या ट्रेनला जागा देण्यासाठी तिला पर्यायी ट्रॅकवर काही काळ ठेवण्यात आले. त्यानंतर ट्रेनने माथेरानपर्यंतचा आपला प्रवास पूर्ण केला. या घटनेनंतर आम्ही प्रवाशांना त्यांचे पैसे परत केले असून सध्या या ट्रेनची सेवा थांबविण्यात आली असून सोमवारपासून दुरुस्तीनंतर ही सेवा कार्यरत होणार असल्याचे, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.