आशालता वाबगावकर यांनी म्हटलेले ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, फैय्याज यांनी सादर केलेले ‘मम बाळ कोणी ओढुनी नेले बाई मी आता नाही आई’ ही नाटय़पदे आणि विजय केंकरे व मोहनदास सुखटणकर यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून ‘संगीत मत्स्यगंधा’च्या विविध आठवणींचा पट उलगडला गेला.
निमित्त होते अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने दादर (पश्चिम)येथील यशवंत नाटय़ मंदिरात गेल्या आठवडय़ात आयोजित केलेल्या ‘मत्स्यगंधा ५०’ या कार्यक्रमाचे. गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन परिषदेतर्फे दरवर्षी कलावंत मेळावा म्हणून साजरा केला जातो. यंदा या मेळाव्यात ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त या नाटकात काम करणारे मोहनदास सुखटणकर, आशालता वाबगावकर, फैय्याज, ललिता केंकरे, भारती मालवणकर-मंगेशकर, कानन कौशल, शोभा आर्य यांचा सत्कार करण्यात आला. प्रकृती अस्वास्थामुळे गायक-अभिनेते रामदास कामत कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. सन्मानचिन्ह आणि कृतज्ञता निधी असे या गौरवाचे स्वरूप होते. अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’च्या कलाविभागाची आणि संस्थेने सादर केलेल्या नाटकांची माहिती दिली. तर सुखटणकर यांनी नाटकाचे लेखक वसंत कानेटकर, संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी, दिग्दर्शक मा. दत्ताराम तसेच नाटकातील आपले सहकलाकार परशुराम सामंत, देवदत्त मणेरीकर, श्रीपादराव नेवरेकर, तुकाराम जाधव या हयात नसलेल्या सर्वाचे स्मरण करून नाटय़ परिषदेने मत्स्यगंधाच्या सुवर्महोत्सवाची दखल घेऊन हयात असलेल्या कलाकारांचा सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आशालता वाबगावकर यांनी मी ‘मत्स्यगंधा’ कशी झाले ते सांगून यातील गाणी कशी शिकले, ते सांगितले आणि उपस्थित प्रेक्षकांच्या आग्रहाखातर नाटकातील ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’हे गाणे सादर केले. तर फैय्याज यांनी आपण नाटकातील पाचवी मत्स्यगंधा कशी झालो, मा. दत्ताराम यांचे मिळालेले मार्गदर्शन याबाबत सांगून ‘मम बाळ कोणी ओढुनी नेले बाई मी आता नाही आई’ हे गाणे सादर केले. या वेळी नाटय़ परिषदेचे विश्वस्त डॉ. रवि बापट, चारुदत्त सरपोतदार, वास्तुविशारद शशी प्रभू यांचाही सत्कार करण्यात आला.
नाटय़ परिषदेच्या कोषाध्यक्षा लता नार्वेकर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रमोद पवार यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद भुसारी यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर सांगली येथील संस्थेने ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाचा प्रयोग सादर केला.