18 January 2019

News Flash

मौलाना आझाद आजही उपेक्षित – तांबोळी

भारताचे पहिले शिक्षणमंत्री असलेल्या मौलाना आझाद यांनी विज्ञापीठ आयोग, साहित्य अकादमी आणि संगीत अकादमीची स्थापना केली. आयआयटीचा आर्थिक निधी त्यांनी २ कोटींवरून ३० कोटींवर नेला.

| November 20, 2012 02:55 am

भारताचे पहिले शिक्षणमंत्री असलेल्या मौलाना आझाद यांनी विज्ञापीठ आयोग, साहित्य अकादमी आणि संगीत अकादमीची स्थापना केली. आयआयटीचा आर्थिक निधी त्यांनी २ कोटींवरून ३० कोटींवर नेला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून घोषित केलेला आहे. मात्र आजही हा द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ उपेक्षित राहिल्याची खंत मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केली.
येथील आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने यंदाचा ‘कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार’ देऊन प्रा. तांबोली यांना गौरविण्यात आले; या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी होते. या वेळी आ. मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष भूषण गायकवाड, आर. के. बागवान, डॉ. सतीश बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. तांबोळी पुढे म्हणाले,की मौलाना आझाद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाईतील आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने साहित्य क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. इतरांना प्रकाशात आणण्याचे कठीण काम संस्थेने  हाती घेतले आहे. मौलाना आझाद सच्चे राष्ट्रभक्त होतेच शिवाय ते महान शिक्षणतज्ज्ञ होते. भारताचे पहिले शिक्षणमंत्री असणारे मौलाना आझाद ‘भारताचे भविष्य’ असल्याचे गौरवोद्गार म. गांधी यांनी काढले होते. मौलाना आझाद यांनी कुराणावर केलेले भाष्य ‘ज्ञानेश्वरी’ इतकेच महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून केवळ सात ओळींच्या ‘आयात’वर त्यांनी दोनशे पानी विवेचन केल्याचे प्रा. तांबोळी यांनी सांगितले. मुस्लीम धर्मात पुरोहित वर्गाचे वाढलेले अवास्तव महत्त्व याबद्दल प्रा. तांबोळी यांनी चिंता व्यक्त केली. मौलाना आझाद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मुस्लीम समाजाने सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. मुस्लिमांनी राष्ट्रनिष्ठा जोपासत मुख्य प्रवाहात राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
आ. मकरंद पाटील म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या प्रा. तांबोळी यांचा गौरव करून आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वाईची परंपरा जोपासली आहे. साहित्यातून संस्कार आणि समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या प्रा. तांबोळी यांच्यासह अन्य साहित्यक्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केल्याबद्दल आ. पाटील यांनी संस्थेबद्दल कौतुकोद्गार काढले. संस्थेच्या कामात सर्वतोपरी सहकार्य राहिल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
अध्यक्षीय भाषणात सतीश कुलकर्णी म्हणाले,‘‘साहित्याचा सन्मान करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका आझाद सेवाभावी संस्था बजावत आहे. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम साहित्यातून झाले पाहिजे. काळजाला हात घालण्याचे सामथ्र्य शब्दांमध्ये असते असे सांगून त्यातून साहित्यिकांनी नव्या विचारांची निर्मिती केली पाहिजे,’’ असे ते म्हणाले. राष्ट्रीय ऐक्याचा पुरस्कार करणारे मौलाना आझाद सर्वानी नीटपणे समजावून घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी प्रा. मुकुंद देवळालीकर, भूषण गायकवाड, डॉ. सतीश बाबर, प्रा. डॉ. श्रीमती कमला हर्डीकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्यावतीने सौ. जया शिंदे, सौ. चारूशीला कुलकर्णी, प्रा. डॉ. बाळासाहेब शिंदे, किरण पाटील, उद्धव पाटील, डॉ. विठ्ठल मदने, प्रा. डॉ. भानूदास आगेडकर, प्रा. डॉ. श्रीमती कमला हर्डीकर, सौ. जया बापट यांना ‘साहित्य गौरव’, तर सनी पाचपुते, सतीश पाटील, आणि कु. स्वरांगी गरुड यांना ‘विशेष कला गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृष्णा साहित्य गौरव विशेषांक आणि प्रा. मुकुंद देवळालीकर यांच्या ‘उमलती फुले’, ‘उमलत्या कळ्या’, ‘ओंजळ’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर सनी पाचपुते आणि सहकलावंतांनी बहारदार लावणीनृत्य सादर केले. सनी पाचपुते यांनी आपल्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली.
आझाद बहुउद्देशीय सेवा संस्थेचे पदाधिकारी प्रा. अमजद इनामदार, अक्रम बागवान, रियाज पटेल, गुलझार शेख, आशपाक मुजावर, यूनूस पिंजारी आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. महंमद शेख यांनी, तर आभार मोअज्जम इनामदार यांनी मानले. सूत्रसंचालन शिवाजीराव जगताप यांनी केले. कार्यक्रमास वाईकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.    

First Published on November 20, 2012 2:55 am

Web Title: maulana ajzad now in waiting tamboli
टॅग Education