एकीकडे प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई उत्सुक असतानाच स्त्री पुरुष असमानता, तरुणींवरील हल्ले याबाबत समाजात आजही जागरूकता नाही. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी, जागरूकता आणण्यासाठी तसेच संवेदनशीलता जागृत करण्यासाठी ‘मावा’ (मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्युज) या संस्थेने रुईया महाविद्यालयात खास तरुणांसाठी १३ व १४ फेब्रुवारी रोजी चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात विविध भाषांमधील आठ चित्रपट दाखवण्यात येणार असून त्यासाठी नोंदणी करून मोफत प्रवेश घेता येईल.
लिंगभाव, पौरुषत्व आणि नातेसंबंध यावर आधारित असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां पुष्पा भावे आणि गे हक्क कार्यकर्ते पल्लव पाटणकरदेखील यावेळी उपस्थित राहतील. तीन वेगवेगळ्या गटांमध्ये चित्रपट विभागण्यात आले आहेत. मराठी चित्रपट धग, गिरिश कासारवल्ली यांचा कन्नड चित्रपट हसिना, नकुल सिंग साहनी यांचा असभ्य बेटीया, शर्मिन चिनॉयचा सेव्हिंग फेस (पाकिस्तान), सिद्धिक बरमाकचा ओसामा (अफगाणिस्तान) हे चित्रपट जात- वर्ग-धर्म- लिंगभाव आणि महिलांसंबंधी हिंसा याच्याशी संबंधित आहेत. पौरुषत्वाच्या पारंपरिक कल्पनेला छेद देणारे चित्रपट- राहुल रॉयचा टिल वी मीट अगेन, बॉइज कॅन नॉट बी बॉइज आणि देवेंद्र बाळसराफ यांचा थँक्स (मराठी) हे दुसऱ्या गटात आहेत. समलिंगी आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या समस्यांची मांडणी करणारे- बायोस्कोपचा निरंतर, शर्मीन ओबेद चिनॉय यांचा ट्रान्सजेंडर : पाकिस्तान ओपन सिक्रेट आणि देवालीना यांचा एबंग बेवारिश (बंगाली) चित्रपटही या महोत्सवाचा भाग आहेत. गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सहा या वेळेत हे चित्रपट रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात दाखवण्यात येतील. हे चित्रपट सर्वासाठी खुले आहेत. प्रत्येक तरुण-तरुणीने हे चित्रपट पाहावेत आणि एकमेकांविषयी संवेदनशील व्हावे असा उद्देश या महोत्सवामागे आहे, असे मावाचे संस्थापक सदस्य हरीश सदानी यांनी सांगितले. या महोत्सवासाठी नावनोंदणी करण्यासाठी  ९९६९७६५६६६ (मानस बर्वे)या क्रमांकावर संपर्क साधता येईल.