शिवसेनेत नाराजी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवक, नेतेमंडळींच्या उपस्थितीत ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी रविवारी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरा केलेला जंगी वाढदिवस सध्या शिवसेना नेत्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरू लागला आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महापालिकेतील शिवसेनेचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, सत्काराच्या कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी महापौरांना थेट पक्षात येण्याचे आवतन तर दिलेच, शिवाय मंत्रिपदाची ऑफरही देऊन टाकली. यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता असून पक्षाचे संपर्कप्रमुख आमदार एकनाथ िशदे यांच्यावरही पक्षातील काही नगरसेवक यामुळे नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते. त्यामुळे महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांशी त्यांचे सूर चांगले जमतात, असा शिवसेना नगरसेवकांचा अगदी सुरुवातीपासूनचा आक्षेप आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदासंघाचे आमदार प्रतास सरनाईक आणि हरिश्चंद्र पाटील यांचे ‘मधुर’ संबंध तर ठाण्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिले जातात. या पाश्र्वभूमीवर पक्षातील जुन्या-जाणत्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत एकनाथ िशदे यांनी महापौरपदासाठी हरिश्ंचद्र पाटील यांचे नाव पुढे करत आपल्या पक्षांतर्गत विरोधकांनाही जेरीस आणल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. गेल्या दोन वर्षांत महापौरांच्या कार्यपद्धतीविषयी शिवसेना नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे. मध्यंतरी पक्षातील पाच ज्येष्ठ नगरसेवकांनी एकनाथ िशदे यांना पत्र पाठवून महापौरांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. पाटील महापौरपदी कायम राहिले तर लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे काही खरे नाही, अशा शब्दात या नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. वर्तकनगर परिसर सरनाईक आणि पर्यायाने शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातील काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या प्रभागातील एका कामासाठी महापौरांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याची चर्चाही रंगली होती. त्यामुळे सरनाईक त्यांच्यावर नाराज आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात रविवारी साजरा झालेल्या महापौरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना थेट आघाडीत सामील होण्याचे आवतन दिल्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या पत्नी नगरसेविका असून त्यांची आणखी एक नातेवाईक महिला नगरसेविका आहेत. ठाणे महापालिकेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता पाटील यांच्याकडील तीन नगरसेवकांचे बळ महापौर निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. त्यामुळे काँग्रेस आघाडीने पाटील यांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात शिवसेनेच्या एकाही नगरसेवकास आमंत्रण देण्यात आले नव्हते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापौरांना उद्देशून ‘तुम्ही काँग्रेसमध्ये या आमदार, मंत्री व्हाल’, अशा शुभेच्छा दिल्यामुळे येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेचे संपर्क नेते आमदार एकनाथ िशदे यांनी या कार्यक्रमाविषयी मौन धारण केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंबंधी महापौरांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.