शहरात समूह स्वच्छता मोहिमेवर महापौर संग्राम जगताप ठाम आहेत. कामगार संघटनेच्या पदाधिका-यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी ही बाब स्पष्ट केली, मात्र कामाच्या सोयीसाठी वेळेत बदल करण्याचे जगताप यांनी मान्य केले.
जगताप यांच्याच पुढाकारातून शहरात दोनदा साफसफाई करण्याचे ठरले होते. त्याला सुरुवातही झाली, मात्र त्यात विस्कळीतपणाच मोठा होता. त्यामुळे दुपारच्या सफाईला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. याबाबत जगताप यांनी सोमवारी शहरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्याशी मनपात चर्चा केली. मनपाचे उपायुक्त महेशकुमार डोईफोडे, यंत्र अभियंता परिमल निकम, उपआरोग्याधिकारी डॉ. पैठणकर, संघटना पदाधिकारी आनंद वायकर या वेळी उपस्थित होते.
लोखंडे यांनी सुरुवातीला यातील अडचणी विशद केल्या. नगरपालिका असताना या कामासाठी रोजंदारी व कंत्राटी पद्धतीने कामगारसेवेत घेतले जात होते. मात्र मनपा झाल्यापासून ते बंद झाले असून वारसा हक्काच्या नोक-याही गेल्याने ही कामगार भरती झालेली नाही. दुसरीकडे शहराची हद्दवाढ होऊन मनपा अस्तित्वात आल्याने कामाचा ताण वाढला असून या पार्श्र्वभूमीवर मनपाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. दोनदा कामासाठी सफाई कामगारांना सकाळी व दुपारी असे दोन पाळ्यांमध्ये यावे लागते. कामाचे अंतर दूर असल्याने त्यातही अडचणी आहेत असे लोखंडे यांनी सांगितले.
जगताप यांनी यातील काही अडचणी मान्य केल्या. मात्र समूह स्वच्छता आराखडय़ावर ते ठाम राहिले. कामगारांनी पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे असे ते म्हणाले. वेळेची अडचण दूर करण्यासाठी आता दुपारच्या पाळीऐवजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत समूह स्वच्छतेच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सफाई कामगारांना प्रभाग समितीनिहाय झाडू व तत्सम साहित्य वितरित करण्याचेही जगताप यांनी मान्य केले.