विधानसभा निवडणुकीचे रंग भरू लागले असताना भांडणात दंग असलेल्या ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हे असून आघाडीत सहभागी असूनही महापौर निवडणुकीत तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेस पक्षाने मनसेच्या सात नगरसेवकांना नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्यासाठी काँग्रेसचा हात हातात घेण्याची कृती मनसेच्या नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. आघाडीचा पक्षादेश झुगारल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने या नोटिसा पाठविल्या असून त्यामुळे मनसेपुढे नवा कायदेशीर तिढा ऊभा ठाकला आहे.
ठाणे महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या लोकशाही आघाडीत मनसेचे सात नगरसेवक सहभागी झाले आहेत. कोकण विभागीय आयुक्तांकडे स्थापन करण्यात आलेल्या या आघाडीत सहभागी होत मनसेने यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीचा पट्टा गळ्यात अडकवून घेतला आहे. त्यामुळे आघाडीचा पक्षादेश बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने मनसेला ही नोटीस बजावली आहे. रवींद्र फाटक यांच्या बंडापूर्वी ठाणे महापालिकेत आघाडी आणि युती अशा दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान होते. त्यामुळे सात नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या मनसेची भूमिका महापालिकेतील सत्ताकारणात महत्त्वाची मानली जात होती. असे असताना कोकण आयुक्तांकडे स्थापन झालेल्या काँग्रेस आघाडीच्या गटात थेट सहभागी होण्याचा निर्णय घेत मनसेच्या स्थानिक नेत्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. कोकण आयुक्तांकडे स्थापन झालेल्या युतीच्या गटात भारतीय जनता पक्षाचे नऊ नगरसेवक थेट सहभागी झाले नाहीत. भाजपने आपल्या नगरसेवकांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी केली. हा शहाणपणा मनसेला दाखविता आला नाही. त्यामुळे आघाडीच्या गटनेत्यांचा आदेश मनसेच्या नगरसेवकांनाही लागू होऊ लागला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या मनसेने आघाडीतून बाहेर पडण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असली तरी यासंबंधीच्या याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने तांत्रिकदृष्टय़ा मनसे अजूनही आघाडीत आहे.

महापौर निवडणुकीतील तटस्थपणा अंगाशी
तांत्रिकदृष्टय़ा आघाडीत सहभागी असूनही नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत मनसेच्या सात नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीतर्फे विक्रांत चव्हाण हे उमेदवार होते. आघाडीतील घटकपक्षांनी चव्हाण यांना मतदान करावे, अशा स्वरूपाचा आदेश गटनेते संजय भोईर यांनी काढला होता. असे असताना काँग्रेसचे चार नगरसेवक आजारी असल्याचे कारण पुढे करत अनुपस्थितीत राहिले तर दोघे नगरसेवक सभागृहात उशिराने पोहोचले. त्यामुळे शिवसेनेच्या विजयात काँग्रेस नगरसेवकांनी हातभार लावल्याची चर्चा रंगली असतानाच मनसेच्या नगरसेवकांचा तटस्थपणा त्यांच्या अंगाशी येऊ लागला आहे.
आघाडीच्या गटनेत्यांचा आदेश असतानाही सभागृहात उपस्थित असलेल्या मनसेच्या नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी या सात नगरसेवकांना नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच कोकण विभागीय आयुक्तांकडे यासंबंधी तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, आघाडीतून बाहेर पडण्यासंबंधी याचिका न्यायालयात प्रलंबित असली तरी कोकण आयुक्तांना पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासंबंधी पत्र पाठविण्यात आले आहे,अशी माहिती मनसेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने वृत्तान्तला दिली. त्यामुळे काँग्रेसने बाजविलेल्या नोटिशीला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.