महापालिका निवडणुकीत मनसेच्या खोटय़ा आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने मनपाची सत्ता मनसेच्या हाती दिली. परंतु आतापर्यंत मनसे सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरली आहे. महापौरांचा प्रभाग तर कचरा डेपो झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सध्या शहरात प्रभागनिहाय बैठकांचे सत्र सुरू आहे. त्याअंतर्गत प्रभाग १३ मध्ये आयोजित बैठकीत कोशिरे बोलत होते. प्रभाग १३ म्हणजे स्वत: महापौरांचा प्रभाग. परंतु प्रभागात फेरफटका मारल्यावर हा प्रभाग महापौरांच्या दुर्लक्षाने अक्षरश: कचरा डेपो झाल्याचे लक्षात येते. सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याने चौकाचौकात घाणीचे साम्राज्य आहे. सुलभ शौचालयाकडून सुविधांच्या नावाखाली जनतेची लूट होत आहे. तरीदेखील महापौरांचे तिकडे लक्ष नाही.महापौरांच्या प्रभागात ही अवस्था तर संपूर्ण नाशिक शहरात काय स्थिती असेल याचा विचारही न केलेला बरा, असे कोशिरे यांनी नमूद केले. शहरात मनसेचे तीन आमदार असताना एकही उल्लेखनीय काम झालेले नाही. याउलट पालकमंत्री व खासदारांनी शहर व जिल्ह्यात विकासकामे केली आहेत. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत शहरातील चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश समन्वयक राहुल बागमार यांनी प्रभाग १३ मध्ये मनसेची मोगलाई सुरू असल्याचा आरोप केला. जी परिस्थिती मोगलांच्या काळात सर्वसामान्यांची होती, तीच आज प्रभाग १३ मधील नागरिकांची आहे. यापुढे जनतेच्या न्याय्य हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरूनदेखील आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी युवा नेते रंजन ठाकरे, शिक्षण मंडळ सदस्य संजय खैरनार, पश्चिम ब्लॉक अध्यक्ष किशोर शिरसाठ आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर देवांग जानी, सतीश आमले, संगीता सुराणा आदी उपस्थित होते.