वाढत्या महागाईच्या काळात गोरगरिबांना दररोज एकवेळचे जेवण मिळणे दुर्लभ होत असताना सोलापुरात सामाजिक कार्यकर्ते अनिल हावले यांनी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात अवघ्या दहा रुपयांमध्ये भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुण्याच्या गणेश पेठेतील दत्त मंदिराजवळ जैन समाज बांधव, तेथील मजूर तथा श्रमिकांसाठी अन्नपूर्णा योजना राबवत आहेत. त्याचे अनुकरण सोलापुरात आपण करीत असल्याचे हावले यांनी सांगितले.
या योजनेचा शुभारंभ उद्या मंगळवारपासून पाथरूट चौकाजवळील हनुमान मंदिरालगत चंद्रकांत म्हेत्रे यांच्या घराजवळ होत आहे. या योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे भोजन केवळ आठ रुपयांत उपलब्ध होणार आहे. तीन चपाती, एक वाटी मिश्र भाजी, आमटी, एक वाटी भात असे भोजन ताटाचे स्वरूप असेल. याशिवाय कडक ज्वारीची भाकरी, धपाटे, बाजरीची भाकरी फक्त पाच रुपये दरात विक्रीस ठेवण्यात येणार आहे.
या योजनेसाठी समाजाच्या विविध थरातील दानशूर मंडळींनी हातभार लावला आहे. यात भारत गॅसचे वितरक सागर भोमाज व चौपाड येथील नवभारत वॉच कंपनीचे राजू जेऊरकर यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे हावले यांनी नमूद केले. दानशूर व्यक्तींनी या मानवतावादी योजनेत सहभागी होण्यासाठी अनिल हावले यांच्याशी (मोबाइल-९४२००९०४४ किंवा ९३७०१४०१११) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.