पटावरील सर्व तात्पुरत्या सेवेतील सहाय्यक प्राध्यापकांना कायम करावे, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सवरेपचार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात या उपोषणाला सुरूवात झाली.
ऐतिहासिक शासन निर्णयाव्दारे २९९ सहाय्यक प्राध्यापकांचे समायोजन करून शासनाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक क्रांतीकारी पाऊल उचलले होते. शासन सेवेत काम करण्यास असलेली अनुत्सुकता, प्राध्यापकांची कमतरता तसेच वैद्यकीय शिक्षणाची होणारी हेळसांड आदी बाबींचा सखोल विचार करून सदरचा निर्णय घेण्यात आला होता. पटावरील सर्व तात्पुरत्या सेवेतील सहाय्यक प्राध्यापकांना कायम करावे, वैद्यकीय शिक्षकांचे निवृत्तीचे वय वर्ष ६२ वरून ६५ करू नये, सहाव्या वेतन आयोगानुसार वैद्यकीय अध्यापकांच्या वेतनातील फरक देण्यात यावा, कालबद्ध पदोन्नती व वेतनश्रेणी द्यावी, डॉक्टर्स, परिचारिका वर्ग तीन व चार यांची रिक्त पदे तात्काळ भरावी, वैद्यकीय अधीक्षक व उपअधीक्षक पदे मंजूर करून तात्काळ भरावी,
बंधपत्रीत सहाय्यक प्राध्यापकांना पुढील नियुक्त्या मिळाव्यात, रुग्णसेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस व तंत्रज्ञ यांना विमा संरक्षण मिळाव्यात,
वरिष्ठ निवासी पदे तात्काळ भरावीत आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.