डॉ. मंदार जोशी यांनी लिहिलेला ‘औषधी विश्वकोश’ हा ग्रंथ विविध उपचार पद्धतीतील डॉक्टरांना एकत्र आणणारा ग्रंथ आहे. त्याचा उपयोग आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि अन्य वैद्यकीय उपचार पद्धतीमधील डॉक्टरांना तसेच सर्वसामान्य लोकांनाही होऊ शकेल, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांनी मुंबईत विलेपार्ले येथे केले.
या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात डॉ. संचेती बोलत होते. या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर, अॅड. पराग अळवणी, लिंकिंग इनोव्हेशन प्रकाशन संस्थेचे संचालक आनंद लिमये, लेखक डॉ. मंदार जोशी हे या वेळी उपस्थित होते.‘औषधी विश्वकोश’ हा एक संदर्भ ग्रंथ असून याच्या मदतीने एका वैद्यकीय उपचार पद्धतीमधील औषधांचा उपयोग दुसऱ्या वैद्यकीय उपचार पद्धतीमधील डॉक्टरांना करता येऊ शकेल, असेही डॉ. संचेती यांनी सांगितले.
या ग्रंथात १५१ औषधी वनस्पतींच्या माहितीचा समावेश आहे. प्रत्येक वनस्पतीची आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, चिनी, युनानी, अरेबिक आदी विविध वैद्यकीय उपचार पद्धतीमधील उपचारांसह माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली. अॅड. अळवणी, डॉ. टिकेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.