दिवाळीचा सण साजरा करू न शकणाऱ्या रुग्णांना आनंद देण्यासाठी मेडिकलमधील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांनी केलेले प्रयत्न संवेदनशीलतेचा परिचय देणारे ठरले आहे. रविवारी सर्वत्र लक्ष्मीपूजन साजरे झाले. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या घरापांसून दूर असलेल्या रुग्णांनाही दिवाळीचा आनंद लुटता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य निर्माण व्हावे, यासाठी डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णांसोबत दिवाळी साजरी केली.
मेडिकलमधील सर्व वार्ड आकर्षकपणे सजविण्यात आले. वार्ड क्र. ९, १०, २६, २७ व पेईंग वार्ड आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. आकाशदिवे, तोरण, वार्डाच्या मुख्य दाराजवळ व आतमध्ये काढलेल्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. येथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी रविवारी सायंकाळी आपापल्या वार्डात लक्ष्मीपूजन करून स्वतच्या हाताने रुग्णांना मिठाई वाटली. याशिवाय मेडिकलतर्फे प्रत्येक रुग्णाला सायंकाळच्या भोजनात बुंदीचे लाडू वाटण्यात आले. गडचिरोलीतील एका प्रौढ महिलेचे पती दहा दिवसांपासून वार्ड क्र. २६ मध्ये दाखल आहेत. दिवाळी घरी साजरी करावी, अशी इच्छा होती, पण घरी जाता येणे शक्य नव्हते. रुग्णालयातही दिवाळी साजरी होऊ शकते, हे पाहून बरे वाटले. घरची दिवाळी येथेच साजरी झाल्याचे समाधान आहे, अशा भावना रुग्णांच्या नातेवाईकांनीही व्यक्त केल्या.