‘एमएसएमआरए’ या वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात विविध विषयांवर मंथन झाले. राज्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी १० अन्य उद्योगातील विक्री प्रतिनिधींनाही न्याय मिळवून देण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
येथील सीटू भवन येथे झालेल्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र नलावडे होते. यावेळी संघटनेचे राज्य महासचिव डॉ. डी. एल. कराड यांनी वैद्यकीय प्रतिनिधींच्या आठ तासांच्या कामाच्या वेळेच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. या आंदोलनाची दखल अद्याप शासनाने घेतलेली नाही. तब्बल पंधरा हजार वैद्यकीय प्रतिनिधींच्या प्रश्नावर शासन निर्णय घेण्यास का विलंब करत आहे, असा प्रश्न कराड यांनी उपस्थित केला. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना १२ तास काम करूनही किमान वेतनही मिळत नाही. कामगार खात्याला शासनाने निष्क्रीय बनवले आहे. संघटनेचे संस्थापक जे. एस. मुजूमदार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा भारतीय औषध उद्योगांवर झालेल्या परिणामांची माहिती दिली. बहुराष्ट्रीय कंपन्या ‘पेटंट’च्या माध्यमातून व्यवसायात आपले बस्तान मांडत आहेत. त्याचे परिणाम औषधांच्या किंमतींवर होत आहे. नवीन कायद्यानुसार सामान्य डॉक्टर्सवर जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील सर्वच घटकांवर केंद्र शासन असे हल्ले करीत आहे. यामुळे व्यापक संघर्ष करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.