हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या दाक्षिणात्य कलाकारांची गर्दी झाली आहे. त्यामुळे तिकडे कधी एकमेकांचे चेहरेही न पाहिलेली ही मंडळी बॉलीवूडमध्ये मात्र एकत्र काम करीत आहेत. चष्मेबद्दूरच्या रिमेकची नायिका तापसी पन्नू बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. तिच्या तीन नायकांपैकी एक आहे दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ. खरेतर, याच सिद्धार्थबरोबर ती दक्षिणेतला पहिला चित्रपट करणार होती. तो योग तिथे जुळला नाही, पण इथे बॉलीवूडमध्ये तिच्या वाटय़ाला आलेल्या पहिल्याच चित्रपटात सिद्धार्थ नायक म्हणून काम करतो आहे.
सिद्धार्थचा चेहरा आता बॉलीवूडला नवीन राहिलेला नाही. ‘रंग दे बसंती’ हा सिद्धार्थचा पहिला हिंदी चित्रपट होता. तापसी हे नाव पूर्णत: नवीन आहे. मात्र, सिद्धार्थ आणि तापसी यांची जुनी मैत्री आहे. कारण दोघांनीही तेलुगू चित्रपटांमधून काम केले आहे. ‘चष्मेबद्दूर’मध्ये तापसी तीन नायकांबरोबर काम करणार आहे. त्यात सिद्धार्थ आहे हे कळल्यावर तिला खूप आनंद झाला. ‘सिद्धार्थ आणि मी आधीपासून एकमेकांना ओळखतो. माझा पहिला तेलुगू चित्रपट त्याच्याबरोबर असणार होता. पण ते काही जमले नाही. आता बॉलीवूडचा पहिला चित्रपट त्याच्याबरोबर करायला मिळाला. त्यामुळे मजा आली. आमच्या दोघांचीही वाटचाल सारखीच असल्याने तेलुगू चित्रपटसृष्टी, तिथले लोक, तिथल्या घडामोडी अशा गप्पा मारण्यासारख्या अनेक गोष्टी आमच्याकडे होत्या’, असे तापसीने सांगितले.
सिद्धार्थच्या ऐवजी तापसीला पहिल्या चित्रपटासाठी नायक मिळाला तो म्हणजे मनोज मंचू आणि तिचा पहिला तेलुगू चित्रपट होता ‘जुमांडी नादम’. दक्षिणेत भेटलो, पण बॉलीवूडमध्ये एकत्र आलो, अशी तापसीची अवस्था आहे. बाकी बिछडे हुए लोकांना एकत्र आणण्याची बॉलीवूडची जुनीच खोड आहे.