नागपूर जिल्ह्य़ातील सिकलसेलच्या विळख्यात जगणाऱ्या लाखो लोकांना मुक्त करण्यासाठी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सिकलसेल दिनाचे निमित्त साधून १९ जूनला आढावा बैठक आयोजित केली आहे. नागपूर जिल्हा आणि विदर्भात सिकलसेलग्रस्त रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील १९ जिल्हे सिकलसेल प्रभावित आहेत.
या पाश्र्वभूमीवर बैठकीत सिकलसेल निवारणावर चर्चा केली जाईल.
सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे सचिव, सार्वजनिक सेवेचे संचालक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, गर्भजल परीक्षण तज्ज्ञ डॉ. शिवकुमार चव्हाण आणि गेल्या २२ वर्षांपासून सिकलसेल निर्मूलनाचे काम करणारे सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. संपत रामटेके यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्य सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने २००७ मध्ये डॉ. संपत रामटेके यांना आमंत्रित केले होते.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अभिनव योजना यशस्वी झाल्यास राज्यातील १९ सिकलसेल प्रभावित जिल्ह्य़ातील रुग्णांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास संपत रामटेके यांनी व्यक्तकेला.