पूर्वसूचनेअभावी नवी मुंबईकर प्रवाशांचे हाल
ठाणे- वाशी- पनवेल मार्गावरील दिघा व गणपती पाडा या ठिकाणी ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम हाती घेण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत रेल्वेने विशेष मेगा ब्लॉक घेतला आहे. मात्र याविषयी प्रवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात न आल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत.
हार्बर लाइनवरील ठाणे-वाशी मार्गावर दैनंदिन हजारो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी अभियांत्रिकी काम हाती घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी दिघा येथे रेल्वे मार्ग विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सोसावा लागला होता. त्या वेळीही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. आता सोमवारपासून सलग सात दिवस तीन तास मेगा ब्लॉक घेतल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रेल्वे स्थानकात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाकडून दिली जात नाही, असा प्रवाशांचा आरोप आहे. ११ ते १ ही शाळेची वेळ असल्याने या मेगा ब्लॉकमुळे विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. विशेषत: ऐरोली-कोपरखरणे येथे काम करणाऱ्या चाकरमान्यांना अचानक घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकने इतर वाहने पकडून जादा अधिभार देऊन कामावर जावे लागत आहे. यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी अतुल राणे यांनी आपण याबाबत प्रवाशांना सूचना दिल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात फलाटावर अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
रेल्वे प्रशासनाने दुपारी मेगा ब्लॉक घेण्याऐवजी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत मेगा ब्लॉक घेतल्यास त्यांचा सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही.
प्रतिभा जाधव, विद्यार्थिनी
ऐन कामाच्या वेळी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना इतर वाहनाने कामावर जावे लागते. रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक घेताना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; मात्र येथे तशी कोणतीही व्यवस्था नाही.
विजय देशमुख ,कामगार
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2014 8:19 am