सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सर्व सेवा संघाच्या वतीने दरवर्षांप्रमाणे यंदाही दिल्या जाणाऱ्या मानवभूषण पुरस्कारासाठी ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज अप्पासाहेब काडादी व लोकमंगल समूहाचे संस्थापक, माजी खासदार सुभाष देशमुख यांची निवड जाहीर झाली आहे. याशिवाय अन्य पाच जणांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत.
सिद्धेश्वर देवस्थान समितीचा पारदर्शक व स्वच्छ कारभार करणारे मेघराज काडादी हे दिवंगत नेते, माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांचे पुत्र आहेत. सुसंस्कृत, संयमी, विनयशील व्यक्तिमत्त्व म्हणून मेघराज काडादी हे ओळखले जातात. तर सुभाष देशमुख यांनी लोकमंगल समूहाच्या माध्यमातून कृषी उद्योग, सहकार, बँकिंग, शिक्षण आदी माध्यमातून उल्लेखनीय कार्य चालविले आहे. त्यांना मानवभूषण पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्काराची घोषणा सिद्धेश्वर सर्व सेवा संघाचे अध्यक्ष एन. बी. शरणार्थी यांनी पत्रकार परिषदेत केली. याशिवाय विजया थोबडे (आदर्श माता), उषा हंचाटे (आदर्श शिक्षिका), स्वाती चौहान (आदर्श शिक्षिका), सुधाकर व्हट्टे (उच्चशिक्षित आदर्श शेतकरी) व रवींद्र दंतकाळे (आदर्श पत्रकार) यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
येत्या रविवारी, २ जून रोजी सायंकाळी पाच वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये आयोजित समारंभात सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या वेळी आमदार प्रणिती शिंदे, महापौर अलका राठोड, माजी आमदार निर्मला ठोकळ यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी एन. बी.शरणार्थी यांनी लिहिलेल्या ‘राष्ट्र उभारणी-एक चिंतन’ या पुस्तकाचे (द्वितीय खंड) प्रकाशन केले जाणार आहे.