सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्य़ात निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे द्विसदस्यीय पथक गुरुवारी अर्धा दिवस येऊन गेले. केंद्राच्या खर्च विभागातील सहायक संचालक बी. एल. मीना, तसेच भारतीय अन्न महामंडळाचे मुंबई येथील एम. आय. कोष्टी यांचा समावेश असलेल्या पथकाने धावपळ करून सहा तासांत जालना, अंबड व घनसावंगी तालुक्यांतील स्थितीची पाहणी केली.
सकाळी पुणे येथून निघालेले हे पथक दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी जालना शहराजवळील घाणेवाडी तलावाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तेथे १५ मिनिटे थांबल्यावर जालना येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. भोजनानंतर अडीच वाजता पुढील दौऱ्यास रवाना झालेल्या पथकाने गाढे सावरगाव, तळेगाव, राणी उंचेगाव, गुरुपिंप्री, घनसावंगी, घनसावंगी तांडा, बोधलपुरी, बहीरगड, ताडहदगाव, पांगरखेडा, खडकेश्वर आदी घनसावंगी व अंबड तालुक्यांतील ११ गावांच्या परिसरात पाहणी केली. या गावांतील पीक स्थिती, फळबागांचे नुकसान, रोजगार हमी कामे, तलाव आदींची पाहणी तीन तासांत झाली. दुपारी तीन वाजता घनसावंगी तालुक्यातील गाढे सावरगाव या पहिल्या गावात पोहोचलेले हे पथक तीन तासांनी म्हणजे सहा वाजता शेवटच्या खडकेश्वर या अकराव्या गावात होते.
नियोजित कार्यक्रमानुसार हे पथक चार वाजता खडकेश्वर येथून रुई गावाकडे प्रयाण करणार होते. परंतु खडकेश्वर गावातच सहा वाजल्यामुळे पथकाचा पुढील रुई व धनगर पिंप्री दौरा रद्द झाला. दुपारी ३ ते ६ या वेळेत गाढेसावरगाव ते खडकेश्वर दरम्यान ११ गावांना भेट दिली असली, तरी या तीन तासांतील त्यांचा जवळपास सव्वातास प्रवासातच गेला. सव्वासहाच्या सुमारास खडकेश्वर येथून निघालेले पथक अध्र्या तासाच्या प्रवासानंतर जालना येथे पोहोचले. तेथे जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी त्यांच्यासमोर जिल्ह्य़ातील स्थितीसंदर्भात सादरीकरण के ले. पथकाचा दौरा साधारणत: सात तासांचा होता, तरी त्यातील त्यांचा घाणेवाडी तलाव, अन्य ११ गावे व परत जालना शहरापर्यंत पोहचण्याचा प्रवासच ९० ते १०० किलोमीटरचा होता. सगळी घाई नि धावपळ. जिल्हा पातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांचीही एकच लगबग. गुरुवारी एवढी धावपळ झाल्यावर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुणे येथे आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांना हजर व्हावे लागले. राज्यातील जालना, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्य़ातील टंचाई परिस्थितीच्या संदर्भात केंद्रीय पथकांतील सदस्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी तेथे बैठक होते. जालना जिल्ह्य़ातील खरीप पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक झालेले नुकसान, सुकत चाललेल्या फळबागा, सध्याची आणि भविष्यात निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाई, कोरडे तलाव इत्यादींची माहिती या वेळी या पथकास जिल्हा प्रशासनाने तपशीलवार सादर केली.