पारनेर सहकारी साखर कारखाने थकवलेले शेतकऱ्यांचे तसेच कामगारांच्या रकमांच्या वसुलीसाठी गोदामातील साखर नेण्याचे आंदोलन आज ऐनवेळी चर्चेअंती तूर्त मागे घेण्यात आले.
आंदोलनासाठी सकाळी ११ वाजता शेतकरी व कामगार कारखान्यावर मोठया संख्येने जमा झाले होते. कामगार नेते शिवाजी औटी यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे असतानाच अधिकाऱ्यांनी संबधितांशी चर्चा करून मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तहसीलदारांच्या दालनात दि. ११ ला संबधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकरी व कामगारांच्या आक्रमक भुमिकेमुळे कारखान्याच्या कार्यस्थळावर सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पुणे येथील बिव्हीजी ग्रुपला पारनेर कारखाना भाडेतत्वावर देण्यात आला असून गेल्या गळीत हंगामात ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांचे टनामागे तीनशे रूपये या कंपनीकडे प्रलंबित आहे. कामगारांचेही पगार तसेच इतर थकीत रकमा असून त्याच्या मागणीसाठी यापूर्वी दोनदा आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलना दरम्यान कंपनीने संपुर्ण देणे आदा करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र त्याल्या तिलांजली देऊन सहा कोटींचा तोटा झाल्याने शेतकऱ्यांना आणखी भाव देणे अशक्य असल्याचे कंपनीने कळविले, तर कामगारांनाही दि. ३० डिसेंबरपर्यंतचेच देणे असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले.
या कंपनीने कारखाना भाडेतत्वावर घेतला त्यावेळी परिसरातील कारखाने जो भाव देतील त्याप्रमाणात भाव देण्याचे अश्वासन देण्यात आले होते. परिसरातील कारखान्यांनी २ हजार २०० रूपयांचा भाव दिलेला असताना कंपनीने मात्र शेतकऱ्यांच्या हातावर प्रतिटन केवळ १ हजार ८५० रूपये टेकवले. त्यामुळे संतप्त शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून उर्वरित  रकमेसाठी संघर्ष करीत आहेत़  कंपनीने दोन वर्षांसाठी कारखाना भाडेतत्वावर घेतल्यानंतर जून २०१३ पर्यंत कामगार संघटनेशी करार करण्यात येऊन तोपर्यंत कामगारांचे पगार व इतर देणे देण्याची जबाबदारी कंपनीवर असल्याचे निश्चीत करण्यात आले. मात्र कंपनीने कराराचा भंग करून दि. ३० डिसेंबर १२ लाच कामगारांना कार्यमुक्त केल्याचे एकतर्फी जाहीर केले. त्यामुळे कामगारांमध्येही असंतोष आह़े  कमी ऊस असल्याचे भासवून दुष्काळी परिस्थीतीचे कारण पुढे करून कंपनीने यावर्षीचा गळीत हंगामही बंद ठेवला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव डेरे, कारखान्याचे अवसायक प्रमोद पाटील, जगदीश गागरे, कोंडीभाऊ तिकोणे, निवृत्ती मते, शिवाजी सरडे, वाय. जी. औटी आदी यावेळी उपस्थित होते.