स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या गलाथान कारभारावर स्थायी समिती सदस्यांनी जोरदार टीका केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत, याबाबत सदस्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरत संताप व्यक्त केला. यावेळी पॅथॉलॉजी साहित्य खरेदी करण्यासाठी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या एस. के. कंपनीला कंत्राट देण्यात येत असल्याच्या प्रस्तावाला विरोध करत सदस्यांनी प्रशासनाला याबाबत जाब विचारला.
एस. के. कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलेले असतानादेखील या कंपनीला वाढीव मुदत कोणत्या आधारावर दिली जाते असा सवाल नगरसेवक एम. के. मढवी यांनी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. फोर्टिज रुग्णालयामध्ये पालिकेकडून पाठवण्यात आलेल्या रुग्णांना दाखल करून घेण्यात येत नाही. तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला तत्काळ मागण्यात येत असल्याने रुग्णाच्या जिवाशी फोर्टिज रुग्णालयाचे प्रशासन खेळत असल्याचा आरोप मढवी यांनी केला. नगसेवक रवींद्र इथापे यांनी वाशी रुग्णालयामधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दरवाजा उघडत नसून चादरी, बेडशीट, उशीचे कवर व्यवस्थित नसल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रामचंद्र घरत यांनी तुभ्रे परिसरात खड्डय़ामध्ये पाणी साचल्याने डेंग्यू व मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे म्हणाले. वाशी येथील रुग्णालयातील कर्मचारी हे आलेल्या रुग्णाशंी व नागरिकांना व्यवस्थित वागणूक देत नसल्याची  तक्रार घरत यांनी केली. अपर्णा गवते म्हणल्या की, टॉयफाईड, मलेरिया, डेंग्यू यावर पूर्वी आरोग्य विभागाची मोहीम राबवली जायची. पण आता ही मोहीम राबवली जात नसल्याचे सांगितले. क्षयरोग व कावळीचे प्रमाण वाढायला लागले असून त्यावर उपाययोजना करायची मागणी केली. यावर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी डेग्यू व मलेरियाच्या वाढत चाललेल्या रुग्णांची  काळजी घेण्यात येईल. फोर्टिज रुग्णलयात रुग्णाला तत्काळ दाखल करून घेण्यात यावे या संदर्भात यावेळी सूचना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांनी प्रशासनाला सूचना करताना वाशी येथील रुग्णालयातील चादरी, बेडशेट याची चौकशी करून घ्यावी. फोर्टिज रुग्णालयात पालिकेच्या वतीने एका जनसंपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच वर्षांला ८०० खाटांचा कोटा हा फोर्टिज रुग्णालयाकडून पूर्ण करून घेतला पाहिजे, वातावरणाच्या बदलानुसार कोणते आजार होऊ शकतात या संदर्भात जनजागृती करण्यात यावी असे आरोग्य विभागाला सांगितले.