बॉर्डर वर्ल्ड फौंडेशन या संस्थेचे जम्मू काश्मीर येथील २० सदस्य महाराष्ट्रातील सहकाराच्या अभ्यासासाठी कोल्हापूर येथे आले असताना त्यांनी दीपक देवलापूरकर यांच्या आर. के. नगर येथील ‘आनंदवन’ या इको फ्रेंडली घरास विशेष भेट दिली. यावेळी देवलापूरकर यांनी पर्यावरणीय दृष्टिकोनातून स्वतच्या राहत्या घरी राबविलेल्या विविध उपक्रमांची व घराच्या रचनेची माहिती करून दिली.
कचऱ्याचे सुनियोजित व्यवस्थापन, त्यातून तयार झालेल्या खतापासून घराभोवती केलेली २४ फळझाडांची लागवड, टेरेसवरील भाजीपाला लागवड, सांडपाण्याचा बागेसाठी वापर, पावसाच्या पाण्याचा पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापर, किचनमधील टाकाऊ पदार्थापासून बायोगॅस तयार करण्यासाठी केलेले संयंत्र आदी उपक्रमांची माहिती देवलापूरकर यांनी प्रात्यक्षिकाव्दारे करून दिली.
यावेळी अॅड. मस्जिद शेख म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी असे उपक्रम राबविल्यास कोणत्याही गावातील कचऱ्याचे, सांडपाण्याचे, पिण्याचे पाण्याचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत.    
अलका देवलापूरकर यांनी काश्मिरी बांधवांचे स्वागत केले, तर आसिफ जमादार यांनी आभार मानले. या भेटीवेळी मिनार देवलापूरकर, करिश्मा चिरमुरे, सीमा गावडे, पद्मकुमार पाटील आदी उपस्थित होते.