आर्णी पालिकेला ‘विकास निधी’
नगर परिषदेला आदिवासी भागाकरिता असणारा विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीची नगराध्यक्ष अनिल आडे, उपनगराध्यक्ष आरीज बेग, विरोधी पक्षनेते प्रवीण मुनगीनवार, नगरसेवक नारायण चलपेलवार या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ विश्रामगृहावर भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. समितीचे अध्यक्ष आमदार जगदीशचंद्र वळवी, सदस्य आमदार दौलत दरोडा, आमदार शेंडगे, आमदार माहाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नगर परिषदेच्या वतीने समितीला निवेदन देण्यात आले. आर्णी नगर परिषद ही नक्षलवादग्रस्त, अतिमागास व आदिवासीबहुल क्षेत्रात येते, परंतु बऱ्याच वर्षांपर्यंत ग्रामपंचायत असल्याने शहराचा विकास होऊ शकलेला नाही. आर्णी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीकरिता राखीव असून नगर परिषदेच्या एकूण चार प्रभागांपैकी तीन प्रभागात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीकरिता राखीव असल्याचे समितीचे अध्यक्ष वळवी व सदस्यांच्या लक्षात चर्चेद्वारा स्पष्ट करण्यात आले. राज्यातील इतर आदिवासी नगर परिषदांच्या धर्तीवर आर्णीला आदिवासी नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही आर्णी नगर परिषदेच्या वतीने पुढे करण्यात आली. समितीचे अध्यक्ष आमदार वळवी यांनी निवेदनासंदर्भात योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे ठोस आश्वासन नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले व तशा सूचनाही अप्पर आदिवासी आयुक्तांना दिल्याचे नगराध्यक्ष अनिल आडे व उपनगराध्यक्ष अरिज बेग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना माहिती दिली.

‘tejaswini award’ to rupali
tejaswini award, rupali, higher education
दृष्टीदोष झुगारून उच्चशिक्षण घेणाऱ्या रूपालीचा ‘तेजस्विनी पुरस्कारा’ने सन्मान
प्रतिनिधी, चंद्रपूर<br />भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने जागतिक महिला दिन व तेजस्विनी सन्मान प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या १० मार्चला श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित कार्यक्रमात दृष्टीदोष असतानाही उच्च शिक्षण घेणाऱ्या रूपाली गुणवंत केळापुरे हिचा तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
 यावर्षीच्या महिला दिनावर दिल्लीपासून मुरमाडीपर्यंत सर्वत्र वारंवार घडत असलेल्या स्त्रियांवरील अत्याचारांचे भयावह सावट आहे. दिल्लीची निर्भया आणि मुरमाडीत तीन बालिकांची हत्या झाली. या विपरीत वास्तवावर व बदलत्या सार्वत्रिक उदासीनतेवर मात करत समाजात स्वत:चे स्थान निर्माण करण्याची स्त्रीची घोडदौड मात्र अथक सुरूच आहे. अशा कर्तबगार युवतीचा ‘तेजस्विनी’ सन्मान देऊन गौरव करण्याचा भारतीय स्त्री शक्तीचा प्रघात आहे. यावर्षीची तेजस्विनी रूपाली केळापुरे ही उच्चविद्याविभूषित युवती आहे. अतिशय कमी दिसण्याच्या जन्मत:च असलेल्या दृष्टीदोषावर आई शैलजा, वडील व गुरुजनांच्या मदतीने यशस्वीपणे मात करून रूपालीने शालेय, पदवी व राज्यशास्त्रातील पद्व्युत्तर शिक्षण भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, जनता महाविद्यालय व सरदार पटेल महाविद्यालयातून पूर्ण केले. अश्विनी व पायल रत्नपारखी या भगिनींनी तिला वाचक व लेखनिक म्हणून विशेष सहकार्य केले. रूपालीने एक वर्ष महाविद्यालयात अध्यापनाचाही अनुभव घेतला. सध्या ती प्रा. डॉ. पद्मा पंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सद्दाम हुसेन यांच्या विशेष संदर्भात इराक-अमेरिका संबंधांचा अभ्यास’ या विषयावर आचार्य पदवीसाठी प्रबंध लेखनात व्यस्त आहे.
प्रत्येक समस्येवर विशेष क्षमतांच्या आधारे ताबडतोब तोडगा काढून सतत पुढे जात राहण्याच्या वृत्तीला रूपालीने जोड दिली ती इंटरनेटवर उपलब्ध असलेली अध्ययनाची सर्व श्राव्य माध्यमे शिकून घेण्याची. प्रबंध लेखनाच्या काळात भावाकडे गुडगावला राहून ती रोज टॅक्सीने दिल्लीतील नेहरू विश्वविद्यालयाच्या अद्ययावत ग्रंथालयात जात असे. तेथे उपलब्ध ई-संदर्भग्रंथ डाऊनलोड करून तिने पीडीएफच्या सहाय्याने त्यांच्या ऑडिओ फाईल्स बनविल्या. काही पुस्तकांच्या फोटो कॉपीज करवून घेतल्या. चंद्रपूरसारख्या छोटय़ा शहरात राहूनही युनिकोडसारखे अद्ययावत माध्यम शिकून घेण्याचा तिचा ध्यास आहे. छोटे छोटे एसएमएस अचूकपणे टाईप करणे तिने परिश्रमपूर्वक शिकून घेतले आहे. मोबाईलच्या मदतीने सर्वाच्या संपर्कात राहण्याचा आणि दिवसा शक्य असेल तेथे आत्मविश्वासपूर्वक एकटीच जाण्याचा तिचा प्रयत्न असतो.
भविष्यात कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनाच्या आधारे आपण दृष्टीदोषावर अवश्य मात करू, असा दुर्दम्य आशावाद तिला प्रगतीची प्रेरणा देतो. गांधीवादाच्या अध्ययनानंतर आक्रमक आणि उतावळा स्वभाव बराच शांत आणि संतुलित झाल्याचे ती मान्य करते.  कैलास मानस सरोवरची यात्रा आणि ताफ्यातून दीर्घ समुद्रीसफर करण्याचे साहसी स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रूपालीला तेजस्विनी सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, लेखक व नाटय़कर्मी श्रीपाद प्रभाकर जोशी, तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. रेखा दांडेकर, सत्कारमूर्ती रूपाली गुणवंत केळापुरे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी भारतीय स्त्री शक्ती वाचकमंचाच्या ‘अग्निशिखा’ या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात येईल. या कार्यक्रमाला महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय स्त्री शक्ती संघटना प्रमुख सविता भट यांनी केले आहे.