शिवाजी पार्कला जेथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, ती जागा पवित्र आहे, पण बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांची स्वप्ने, त्यांची राजकीय, सामाजिक तसेच कला, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी या सर्वांचा आलेख त्या जागेत मावणारा नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असे उत्तुंग स्मारक उभारण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. गेले काही दिवस शिवाजी पार्क येथे स्मारक उभारण्यावरून सुरू असलेला वाद अनाठायी असून लवकरच आपण शिवसेना नेत्यांकडून त्यांना अपेक्षित असलेल्या स्मारकाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
केवळ राजकरणच नव्हे तर समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, कलावंत, व्यंगचित्रकार अशा अनेक अंगांनी नटलेल्या अशा या लोकविलक्षण व्यक्तीचे स्मारकही तेवढेच भव्य होणे आवश्यक आहे. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा आग्रह मनोहर जोशी, संजय राऊत यांनी धरला असला तरी सरकारचा त्यास विरोध आहे, शिवाय तेथे स्मारक उभारण्यात कायदेशीर अडचणीही आहेत हे वास्तव आता या नेत्यांनीही जाणले आहे. त्यामुळे या जागेवरच स्मारक उभारण्याचा हट्ट निवळत चालला असून तेथील लहानशा जागेत ते होऊ शकणार नाही, हे वास्तवही सेनेच्या नेत्यांनी लक्षात घेतले आहे.
शिवाजी पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी स्मारकाच्या धर्तीवर सेनाप्रमुखांचे भव्य स्मारक होणे आवश्यक असल्याचे सेनेतीलच अनेकांचे म्हणणे आहे. या स्मारकात शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट असेल, त्यांनी मराठी माणसांकरता पंचेचाळीस वर्षे केलेला संघर्ष, त्यांचे कलावंत व साहित्यांशी असलेले संबंध लक्षात घेता भव्य कलादालन, ग्रंथालय, ऑडिटोरियम असे सर्वार्थाने समृद्ध स्मारक असणे आवश्यक असल्याचे सेनेच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. शिवाजी पार्क येथे एवढे मोठे स्मारक उभे करता येणे शक्य नाही. स्वत: बाळासाहेबांचा केवळ पुतळे उभारण्यावर फारसा विश्वास नव्हता. वर्षांतून एकदा जयंती व मृत्यूदिनाला जाऊन हार घालणे ही खरी श्रद्धांजली नाही, असेही बाळासाहेब म्हणत. त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या कार्याचा आदर्श समाजासमोर राहील, त्यापासून समाजाला प्रेरणा मिळेल व समाज घडविण्याचे काम होईल असे काम उभे राहणे हे त्या व्यक्तीचे स्मारक ठरेल, असेही बाळासाहेबांचे मत होते.
बाळासाहेबांनी अनेक माणसे घडवली. राजकारणात अनेकांना त्यांच्यामुळे सत्तास्थाने मिळाली. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या कार्यातून त्यांना खरी श्रद्धांजली यापैकी किती जण वाहणार हा आता खरा प्रश्न आहे. आता महापालिकेतील प्रत्येक गोष्टीला बाळासाहेबांचे नाव देण्याची स्पर्धा लागेल. आरोग्य विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याची सूचना मांडण्यात आली आहे. तशा अनेक सूचना येतील परंतु ते त्यांचे खरे स्मारक नसेल म्हणून उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या नेत्यांची बैठक बोलाविण्याचा निर्णय घेतला असून या बैठकीत नेत्यांकडूनच स्मारक उभारणीचा संकल्प समजून घेतला जाणार आहे.