समुद्राला आलेल्या २३ व २४ जुलै १९८९च्या महाकाय प्रलयाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून या महाप्रलयात एकूण ७२ मच्छीमार बोटी बुडाल्या होत्या, या महाप्रलयात ३५० खलाशांना जलसमाधी मिळाली होती. यामध्ये उरण तालुक्यातील करंजा गावातील मच्छीमारांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. या महाप्रलयातील प्राण गमावलेल्या मच्छीमारांना स्मरण करण्यासाठी शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करंजा येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाप्रलयातील खलाशांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी करंजा येथे स्मारक उभारण्याचा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आलेला आहे.
या महाप्रलयात उरण-पनवेल तालुक्यातील एकूण ६८ जणांचा मृत्यू झालेला होता. यामध्ये करंजा २०, केळवणे-१६, दिघोडे-१०, गव्हाण-५, पाणजे-३, हनुमान कोळीवाडी-३, आवरे-२, टाकीगाव-३, मुळेखंड-१, बारापाडा-१, आपटा-१ या गावातील मच्छीमारांचा समावेश होता. महाप्रलयात बुडालेल्या ७२ मच्छीमार बोटीमध्ये उरण -पनवेलमधील ६१ बोटी होत्या. यामध्ये करंजामधील-५२, दिघोडे-६, केळवणे-२ व मुळेखंड १ यांचा समावेश होता. या महाप्रलयात आश्चर्यकारक ४० मच्छीमार खलाशी वाचले होते. या वेळी महाप्रलयात मृतांच्या नातेवाईकांना तसेच महाप्रलयात झुंज देत बचावलेल्या मच्छीमारांना आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी या घटनेचे स्मरण करणाऱ्या चित्रांचा प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वेळी या महाप्रलयात मृत पावलेल्यांच्या आठवणी जाग्या करण्यात आल्या. याप्रसंगी रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे चेअरमन कृष्णा गिदी, भगवान नाखवा, गोकुल नाखवा, महादेव घरत आदीजण उपस्थित होते.