मनोरुग्णालयातील महिलेचा उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी दोन मनोरुग्णाचाही मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आणखी तीन-चार रुग्ण अत्यवस्थ असल्याचे वृत्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शीला शेंडे असे मरण पावलेल्या मनोरुग्ण महिलेचे नाव आहे. मानसिक उपचार करण्यासाठी तिला कोराडी मार्गावरील विभागीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला न्यूमोनिया झाला होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तिला मेडिकलच्या वार्ड क्र. २४ मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. मनोरुग्णालयात साध्या आजारासाठी औषधे उपलब्ध नाहीत. तसेच रुग्णांच्या खोल्यांमध्ये कुलरची व्यवस्था नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे रुग्णांना काही आजार झाल्यास उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठवले जाते. काही दिवसांपूर्वीच येथील मनोरुग्ण अशोक आहुजा आणि जगन किसन या दोघांची प्रकृती खराब झाल्याने मेडिकलमध्ये पाठवण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या एका आठवडय़ात तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मनोरुग्णालयातील आणखी तीन-चार रुग्ण अत्यवस्थ असून त्यांच्यावरही मेडिकलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आजारी मनोरुग्णांना मेडिकलमध्ये पाठवले जाते. सुरुवातीला त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. आजार वाढल्यानंतर मात्र त्याची दखल घेतली जाते. तोपर्यंत बराच उशीर झाला असतो.