बारा लाख रुपयांचा इसार घेऊन नंतर बनावट मृत्युपत्र व प्रतिज्ञापत्राद्वारे जमीन खरेदीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपावरुन कोतवाली पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन विशाल प्रविण देढगावकर (३०, रा. जुना कापड बाजार, नगर) याला अटक केली आहे. त्याला उद्यापर्यंत (शनिवार) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला.
अमोल प्रविण देढगावकर, रंजना प्रविण देढगावकर व सुशिला वसंतराव देढगावकर (सर्व रा. जुना कापड बाजार) असे अन्य आरोपी आहेत. यासंदर्भात मुकेश दिगंबर देवळालीकर (रा. ख्रिस्तगल्ली, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल देढगावकर यांची सिटी सर्वे क्र. २७३२/१६ क क्षेत्रफळ ५९/५ जमिन आहे. तिचा १/५ हिश्श्याचा व्यवहार मुकेश देवळालीकर यांच्याबरोबर ठरला. मुकेशने त्यापोटी १२ लाख रुपयांचा इसार विशाल यांना दिला. तरीही मुकेशने अमोल व रंजना यांना हाताशी धरुन वसंतराव हरिभाऊ देढगावकर यांचे बनावट मृत्यूपत्र व प्रतिज्ञापत्र तयार करुन जागा सुशिला यांच्या नावे केली व फसवणूक केल्याची फिर्याद आहे.  २४ जून २०११ व १६ एप्रिल २०१२ रोजी ही फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. काल गुन्हा दाखल करण्यात आला. वसंतराव यांचा २४ नोव्हेंबर २०१० रोजी मृत्यू झाला. सुशिलाबाईने २३ डिसेंबरला नोटरी आर. एच. बोरा यांच्यासमोर मुळ प्रतिज्ञापत्र तयार केल्याचे पोलीस तपासात आढळले.