गोळीबार करून सराफाला लुटण्याच्या खळबळजनक घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच दरोडेखोरांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज, रविवारी कर्जत शहरातील व्यापा-यांनी उत्स्फूर्त बंद पाळला. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ज्योतिपाल दादू घोडके यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक व नागरिकांनी विरोध केला. सुमारे तीन तास पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवण्यात आला होता. घोडके यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून दहा लाखापर्यंत मदत मिळवून देण्याचे खासदार दिलीप गांधी यांनी व दीपक शहाणे यांनी सराफ संघटनेच्या वतीने १ लाख रुपये व भाजपतर्फे एक लाख असे अर्थसाहाय्य देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.
दुकान बंद करून घरी जाणारे सराफ व्यावसायिक सुशांत संतोष कुलथे व ज्योतिपाल दादू घोडके यांच्यावर काल सायंकाळी दरोडेखोरांनी गावठी कट्टय़ातून गोळय़ा झाडून दागिन्यांची पिशवी पळवली. त्यामध्ये घोडके यांचा मृत्यू झाला. सुशांत गंभीर जखमी झाला. या घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले. नागरिकांनी सकाळपासूनच व्यवहार बंद ठेवले होते. शहरात तणावाचे वातावरण होते. सराफ व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक शहाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांना भेटले. या वेळी अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, नामदेव राऊत, बळीराम यादव, राजेंद्र देशमुख, सचिन पोटरे, दीपक शिंदे, अशोक खेडकर, नितीन धांडे, राजेद्र गुंड, महिला आघाडीच्या मनीषा कुलथे, मनीषा वडे आदी उपस्थित होते. संतप्त नागरिकांनी पोलिसांवर गंभीर आरोपही करण्यात आले. उपअधीक्षक पाटील यांनी गुन्हय़ाचा लवकरच छडा लावू तसेच तक्रारी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मृत ज्योतिपाल घोडके यांच्या पार्थिवावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्जत शहराला पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून छावणीचे स्वरूप दिले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार उपअधीक्षक, पाच निरीक्षक, दीडशेहून अधिक कर्मचारी तैनात होते. शिवाय श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, चेहरा स्केचर हजर होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे-साळुंके यांनी तपासासाठी तीन पथके रवाना केल्याची माहिती दिली.
गुन्हय़ातील मोटारसायकल पोलिसाची
दरोडेखोरांनी ज्या पल्सर मोटारसायकलचा वापर गुन्हय़ात केला ती नगर शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याची आहे. ८ जानेवारीला दिल्लीगेट येथून ती चोरीस गेली होती. घटनेच्या दिवशी दिवसभर शहरामध्ये संशयित मोटारसायकल फिरत होती. या वेळी पोलिसांची वाहन तपासणी सुरू होती. त्या मोटारसायकलची तपासणीही केली, मात्र कागदपत्रे न पाहताच वाहतूक पोलिसांनी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करून सोडल्याची चर्चा आहे. संबंधित पोलिसास निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली.
 नगरमध्ये बंद, मोर्चा
कर्जतमधील घटनेच्या निषेधार्थ नगरसह जिल्हय़ातील सराफ व्यावसायिकांनी बंद पाळला. नगरमधील सराफ सुवर्णकार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा नेला. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना शस्त्र परवाने मिळावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले. संघटनेचे राज्य अध्यक्ष फत्तेचंद राका, जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा, शहराध्यक्ष सुभाष मुथा, पदाधिकारी निळकंठ देशमुख, अनिल पोखर्णा, प्रमोद बुऱ्हाडे, अमृत संकलेचा, राजेंद्र ओसवाल आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.