मंडईमधील गाळ्यांसाठी दादर येथील बाजार विभागाच्या कार्यालयात अर्ज घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांची अतोनात गर्दी आवरताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. गोंधळामुळे अखेर तासभर आधीच अर्ज स्वीकारणे बंद करावे लागले. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांना आवरण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. अखेर अनेकांना अर्जासोबतच माघारी परतावे लागले.
वाळकेश्वर, ताडदेव, दादर, माहीम, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला येथील ११ मंडयांमधील ५०, ७० आणि १०० चौरस फुटाचे २६३ गाळे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यासाठी १९ जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र व्यापाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अर्जस्वीकृतीच्या प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. १५ जुलै रोजी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी दुपारी ६० ते ७० व्यापारी दादरमधील पारसमणी इमारतीमधील बाजार विभागाच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्यामुळे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ उडाली. या गोंधळातच अर्जस्वीकृतीचे काम दुपारी १२च्या सुमारास बंद करण्यात आले. प्रत्यक्षात अर्जस्वीकृतीचे दुपारी १ पर्यंत सुरू असेल, अशा अपेक्षेने व्यापारी आले होते. त्यामुळे पालिका कार्यालयात गर्दी वाढली. त्यावेळी झालेल्या गोंधळामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी अखेर पोलिसांना पाचारण केले.