राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याविषयी संभ्रमावस्था
वसंत गिते यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे देऊन दबावतंत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी दुसऱ्या गटाने सर्व नगरसेवक एकसंध असल्याचे दर्शवत राजीनामा नाटय़ातील हवा काढून घेण्याची रणनिती ठेवली आहे. गिते यांच्या राजीनाम्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे कशी दखल घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिंमासा करण्यासाठी बुधवारपासून राज यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्याबाबत संभ्रमावस्था आहे. अपघातात मुलगी जखमी झाल्याने ते येतील की नाही, याबद्दल स्थानिक पातळीवर संभ्रमावस्था आहे. गिते व त्यांच्या समर्थकांच्या राजीनामा नाटय़ामुळे विरोधी गटाने चांगलीच उचल खाल्ली आहे. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतरही पक्षातील सुंदोपसुंदी कायम असून भाजप व शिवसेना त्यास खतपाणी घालत असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर, मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी सरचिटणीसपदाचा तर त्यांचे समर्थक जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष व नगरसेवक आदींनी सामूहिक राजीनामा देत पक्षाच्या बालेकिल्ला डळमळीत करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. खुद्द गिते व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षात राहणार असल्याचे म्हटले असले तरी भाजप व शिवसेनेचे नेते ते आपल्या संपर्कात असल्याचे सांगत भेटीगाठी घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या बालेकिल्ल्यात मनसेला दारूण पराभव पत्करावा लागला. महापालिका हाती असुनही विकास कामे करण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी मनसेविषयीची नाराजी लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही पक्षाला भोवली. या सर्व घडामोडींचा परामर्श घेण्यासाठी राज हे बुधवारपासून तीन ते चार दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधीच गिते व त्यांच्या समर्थकांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामे सादर केले. पराभवाची कारणमिंमासा होण्याआधीच गिते यांनी स्वीकारलेल्या पवित्र्याने स्थानिक पातळीवरील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी गिते पक्षांतर करतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, त्यांनी मनसेच्या तिकीटावर नाशिक मध्य मतदारसंघात निवडणूक लढविली आणि पराभूत झाले.
सरचिटणीसपदाचा राजीनामा देताना गिते यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव या जबाबदारीला न्याय देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. गिते पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी महापालिकेतील ३३ नगरसेवकांनी आपण पक्षातच राहणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांच्यासोबत उभे राहणारे कोणी नगरसेवक नसल्याचे दर्शविले जात आहे. गिते यांच्या राजीनाम्यामुळे दुसरा गट एकदम सक्रिय झाला आहे. वरकरणी सर्व आलबेल दर्शविले जात असले तरी गिते यांनी पक्ष सोडल्यास आपल्या पथ्यावर राहील असे त्यांचे समीकरण आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, महापालिकेतील एकुणच कामकाज, यामुळे सहन करावी लागणारी नाराजी, रखडलेली विकास कामे अशा विविध विषयांवर राज यांच्या दौऱ्यात चर्चा होणे अपेक्षित आहे. बुधवारपासून त्यांचा नाशिक दौरा निश्चित झाला होता. परंतु, राज यांची मुलगी उर्वशी हिचा अपघात झाल्यामुळे बुधवारच्या दौऱ्याबद्दल अद्याप स्पष्टता झाली नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते शर्वरी लथ यांनी सांगितले.