सार्वजनिक विघ्नहर्त्यांची आरास पाहण्यासाठी गणेशभक्त तयारीत असतानाच गेले दोन दिवस सायंकाळी पडणाऱ्या जोरदार पावसामुळे गणेशभक्तांसोबतच कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विघ्न निर्माण झाले आहे. सांगली-मिरज शहरात सोमवारी दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सखल भागात पाणी साचले असून, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे वाचविण्यासाठी त्रेधा उडाली होती.
यंदाचा गणेशोत्सव सुरू झाल्यापासून दररोज पावसाची हजेरी आहे. दिवसभर उन्हाचा कडाका असला तरी सायंकाळी जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी ठरलेली आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेला पाऊस पाच वाजेपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे शहरवासीयांची दैना उडाली.
पावसामुळे सांगलीच्या राम मंदिर, सिव्हिल चौक, मारुती चौक, टिळक चौक, सिटी पोस्ट, राजवाडा चौक आदी ठिकाणी पाणी साचले होते. रहदारीमुळे रस्त्यावरील पाणी पदपथावर आल्याने पावसापासून बचावासाठी थांबलेल्या नागरिकांना त्रास होत होता, तसेच दुचाकी वाहनचालकांनाही या पावसाचा फटका बसला. मिरज शहरातील मंगल टॉकीज, तांदूळ मार्केट, दत्त मदान आदी ठिकाणी पावसाचे गुडघाभर पाणी साचले होते.
दुपारी झालेल्या पावसामुळे दोन दिवस उरलेला गणेशोत्सव पाहण्यासाठी गणेशभक्त घराबाहेर पडण्यास नाखूश होते. याचा फटका हातगाडय़ांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांना बसला.