पुढील तीन वर्षांमध्ये ताडदेव, गावदेवी, खेतवाडी नेपिअन्सी रोड, मालाड, कुर्ला या परिसरांतील नागरी सेवा-सुविधा कोलमडण्याची चिन्हे असून पालिकेच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापन या चार नागरी सुविधा धोक्याच्या उंबरठय़ावर आहेत, असे भाकीत प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालात वर्तविले आहे. महापालिका प्रशासनाकडे २००८ ते २०१४ या कालावधीत सादर झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा अभ्यास करुन फाऊंडेशनने हा निष्कर्ष काढला आहे.
आगामी तीन वर्षांत मालाड पश्चिम आणि पूर्व (पी-उत्तर, प्रभाग क्रमांक २९ ते ४४), कुर्ला (एल विभाग, प्रभाग क्रमांक १५० ते १६४) आणि ताडदेव, गावदेवी, खेतवाडी, नेपिअन्सी रोड (डी विभाग, प्रभाग क्रमांक २१० ते २१६) हे तीन विभाग विविध नागरी सुविधा व सेवांच्या बाबतीत धोक्याच्या उंबरठय़ावर जाणार आहेत. यात पी-उत्तर विभागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. मलनिस्सारण आणि रस्ते याबाबतीत एल विभागात सर्वाधिक तक्रारी दाखल होऊ शकतात तर डी विभागात घनकचऱ्याची समस्या उग्र होऊ शकते, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त नीताई मेहता यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
हिवताप, डेंग्यू व अतिसार वाढणार
महापालिकेतील जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पूर्व), विलेपार्ले (पूर्व) अर्थात के-पूर्व विभागात पिण्याचे पाणी आणि जंतुनाशक फवारणी याबाबतीतच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागात आगामी तीन वर्षांत हिवताप, डेंग्यू, अतिसार या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या विभागात २०११ ते २०१४ या कालावधीत झालेल्या मृत्यूंच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला असल्याची माहितीही मेहता यांनी दिली.
महापालिकेच्या नागरी सनदेनुसार नागरिकांचे विविध प्रश्न किंवा तक्रारी किती दिवसांत सोडवल्या गेल्या पाहिजेत, याचा एक मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र दिलेल्या दिवसात तक्रारी सोडविण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. मलनिस्सारणाबाबतची तक्रार आल्यास ती एक दिवसात सोडविली जाणे अपेक्षित आहे. मात्र २०१३ मध्ये याबाबतच्या तक्रारी सोडविण्यास सात दिवस तर २०१४ मध्ये १७ दिवस लागले आहेत. जलवाहिन्यांतील गळतीबाबतची तक्रार सात दिवसांत सोडविली जाणे अपेक्षित असताना २०१३ व २०१४ मध्ये त्यासाठी अनुक्रमे १३ आणि १७ दिवस लागले आहेत. ‘प्रजा’चे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले, २०१४ मध्ये ६६ हजार ७४७ नागरी समस्यांपैकी केवळ ३५ टक्के समस्या पालिका प्रशासनाने सोडविल्या. सर्वसाधारणपणे नागरी समस्या सोडविण्यासाठी १७ दिवस लागले आहेत. दूषित पाणी, ड्रेनेज तुंबणे, कचरा उचलणे या तक्रारी तीन दिवसांमध्ये सोडवल्या गेल्या पाहिजेत.
प्रभाग समितीमधील नगरसेवकांची कामगिरी
मार्च २०१२ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महापालिका प्रभाग समितीच्या झालेल्या बैठकीतील नगरसेवकांच्या कामगिरीचा अहवालही प्रजाने जाहीर केला आहे. मार्च २०१२ ते डिसेंबर २०१२ दरम्यान २४, जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१३ दरम्यान १९, तर जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ दरम्यान २७ नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत एकही प्रश्न विचारला नाही. या तीनही वर्षांमध्ये नगरसेविका अनीता यादव, ज्योत्स्ना परमार आणि उज्ज्वला मोडक यांनी एकही प्रश्न प्रभाग समितीमध्ये उपस्थित केला नाही. यापैकी उज्ज्वला मोडक यांनी २०१४-१५ मध्ये सुधार समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. २२७ नगरसेवकांनी २०१४ मध्ये प्रभाग समितीच्या बैठकीत एकूण ९७० प्रश्न विचारण्यात आले. म्हणजे एका बैठकीत फक्त तीन प्रश्न झाले. यापैकी १०९ प्रश्न हे रस्ते व चौकाच्या नामकरणाशी संबंधित होते.