तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हजारो कर्मचाऱ्यांना ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा मंडळ) योजना लागू झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्य कवच मिळाले आहे. परंतु काही डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेला व्यावसायिक स्वरूप दिल्याने तळोजातील कामगारांना या योजनेतील सवलतीचे उपचार हजारो रुपये मोजून करावे लागत आहे. याचा प्रत्यय प्रज्ञा बनसोडे या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना आल्याने त्यांना रोगापेक्षा इलाज भारी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील लॅसन इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रज्ञा बनसोडे या १८ जून रोजी कामावरून घरी जात असताना मुंब्रा-पनवेल मार्गावर त्यांना अपघात झाला. जखमी प्रज्ञाला कळंबोलीनजीकच्या सत्यम मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे रुग्णालय ईएसआयसीच्या पॅनलवर आहे. प्रज्ञा ही ईएसआयसी योजनेची लाभार्थी असल्याचे सांगूनही तिच्यावर उपचारासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्याची रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मागणी केली. प्रज्ञाच्या नातेवाइकांनी त्वरित पाच हजार रुपये रुग्णालयाकडे जमा केले. त्यानंतर उपचाराला सुरुवात झाली, असे प्रज्ञाचे नातेवाईक सुनील कंठे यांनी सांगितले. प्रज्ञा हिच्या पाठीच्या बरगडय़ांना मार लागला होता. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटीस्कॅन व एमआरआय करायला सांगितले. पण या दोन्ही चाचण्यांचा खर्च ईएसआयसी योजनेत मिळत नसल्याने या चाचण्यांसाठी वेगळी रक्कम अदा करावी लागेल असे रुग्णालय व्यवस्थापनाकडून प्रज्ञाच्या नातेवाइकांना सांगण्यात आले. कसेबसे दहा दिवस प्रज्ञाने या रुग्णालयात काढले, त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने प्रज्ञाला तिच्या नातेवाइकांनी पनवेल येथील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रज्ञाने पोलीस व ईएसआयसी प्रशासनाकडे याबाबत तक्रारही केली आहे. सध्या प्रज्ञाची प्रकृती चिंताजनक आहे, लाइफलाइन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात प्रज्ञावर उपचार सुरु आहेत. तिच्यावर योग्य प्राथमिक उपचार न झाल्याने बरगडींसोबत तिच्या फुफ्फुसाला मार लागल्याचे आढळले आहे.
प्रज्ञाचे मामा सुनील कंठे यांनी योजना एकच मात्र दोन वेगवेगळ्या रुग्णालय व्यवस्थापनांच्या कारभाराविषयी चिंता व्यक्त केली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ५० हजार कायम व कंत्राटी कामगारांचे महिन्याचे लाखो रुपये ईएसआयसी योजनेत जमा होतात. परंतु ईएसआयसीचे या परिसरात एकही हक्काचे रुग्णालय नाही. त्यामुळे तालुक्यातील विविध खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ ईएसआयसी प्रशासन व कामगारांवर आली आहे.

सामाजिक हक्कांसाठी आंदोलनाचा इशारा
तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (टीएमए) ने तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयसीचे रुग्णालय किंवा किमान दवाखाना असावा यासाठी टीएमएम इमारतीत जागा देऊ केली आहे. त्याबाबतही कोणतीही हालचाल झालेली नाही. प्रज्ञाच्या उपचारातील दिरंगाईचे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळंबोली शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांच्यामुळे उघडकीस आले. प्रज्ञासारख्या अनेकांना सत्यम रुग्णालयात वैद्यकीय सेवेचे व्यापारीकरण झाल्याचा अनुभव आल्यामुळे, यापूर्वीही या रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात मनसेने आवाज उठवल्याचे चव्हाण यांनी महामुंबई वृन्तात्तशी बोलताना सांगितले. सत्यमसारखी व्यापारी रुग्णालये ईएसआयसी प्रशासनाच्या पॅनलवरून न काढल्यास मनसे सामान्य कामगारांच्या सामाजिक हक्कासाठी आंदोलन करेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

रुग्णालयाचे १० हजार खर्च
सर्व आरोप खोटे आहेत. दोन दिवस प्रज्ञा बनसोडे यांच्या नातेवाइकांनी ईएसआयसीची कागदपत्रे रुग्णालय व्यवस्थापनाकडे जमा केली नाहीत. पाच हजार रुपये परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रज्ञा बनसोडे यांच्यावर रुग्णालयाने दहा हजार रुपये खर्च केला आहे. त्या बदल्यात आठ हजार रुपये घेतले आहेत. कोणतीही नियमबाह्य़ गोष्ट रुग्णालयाच्या वतीने झालेली नाही. उलटसरशी आम्ही वैद्यकीय सेवा पुरविताना बिकट आर्थिक परिस्थिती असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत.
-डॉ. संजय बरनवाल,
सत्यम मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे मालक