शहरातील ऑटोरिक्षांना १ जुलैपासून मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येणार असून ३७०७ परवानाधारक रिक्षांपकी आतापर्यंत ५५२ ऑटोरिक्षांना मीटर बसवण्यात आले आहे.
मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, नांदेड व लातूर या चार महापालिका कार्यक्षेत्रातील परवानाधारक ऑटोरिक्षांना मीटर सक्तीचे करण्यात आले आहे. १ फेबुवारी २०१२ पासून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र त्या विरोधात रिक्षा संघटना न्यायालयात गेल्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी प्रलंबित होती. सर्वोच्च न्यायालयाने मीटर सक्तीला अनुकूलता दाखवली असल्यामुळे आता १ जुलपासून रिक्षांना मीटरची सक्ती केली जाणार आहे. शहरात विनापरवाना सुमारे ८ हजार रिक्षा चालतात. त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे आता परवानाधारक रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे.