मुंबईतील ‘मोनो रेल’ अजूनही ‘विरंगुळ्याचे साधन’च राहिली असताना रविवारी सुरू झालेली मेट्रो मात्र ‘चाकरमान्यांची गरज’ बनण्याची शक्यता दिसत आहे. रविवारी कुतूहल म्हणून सुमारे लाखभर मुंबईकरांनी मेट्रोतून सफर केली असली तरी सोमवारी, कामाच्या दिवशी मात्र चाकरमान्यांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला. अंधेरी पूर्वेच्या एमआयडीसी, चकाला आदी पट्टय़ात औद्योगिक वसाहती आणि कॉर्पोरेट हब आहेत. त्यामुळे येथे जाणाऱ्या हजारो लोकांसाठी मेट्रो ‘सुवर्णमार्ग’ ठरत आहे. बेस्टच्या लांबच लांब रांगा आणि भरमसाठ भाडे देऊनही रिक्षा चालकांची मनमानी मोडून काढत सोमवारी पहिल्या दिवशी चाकरदारांनी मोठय़ा संख्येने मेट्रोच्या नव्या मार्गावरून आपल्या कामाच्या ठिकाणी जाणे पसंत केले.
 मेट्रो सोमवारी सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने सुरू झाली. अंधेरी हे पश्चिम उपगनरातील सर्वात महत्त्वाचे आणि गर्दीचे रेल्वे स्थानक. अंधेरी पूर्वेला एमआयडीसी हा मोठा औद्योगिक पट्टा तसेच कॉर्पोरेट हब आहे. रेल्वे स्थानकात उतरून चकाला, साकीनाका, विमानतळ, एमआयडीसी या भागात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. बसेससाठी रांगा असतात आणि वाहतूक कोंडीत प्रचंड वेळ जातो. वर रिक्षाचालकांची दंडेली सहन करावी लागते. त्यामुळे मोठय़ा अपेक्षेने आणि उत्साहाने या टप्प्यावरील प्रवासी मेट्रोकडे वळले.
सोमवारी सकाळपासूनच मेट्रोला मोठी गर्दी होती. पहिल्या दिवसाचे नवेपण कुठेही जाणवत नव्हते. मेट्रोच्या स्थानकावर रेल्वे स्थानकाप्रमाणेच मुक्त वावर करता येतो. ‘मोनो रेल’ची सुरक्षा व्यवस्था स्थानक परिसरात कुणाला घुटमळू देत नाही. इथे मात्र उलटे चित्र होते. रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाली होती. गर्दीला मार्गदर्शन करताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. मेगाफोनवरून कर्मचारी सूचना देत होत्या. पहिल्या दिवशी कामावर जाणारे मोठय़ा संख्येने होते तसेच कुतूहलापोटी आलेले तरुणीतरुणीही मोठय़ा संख्येने दिसत होते. महाविद्यालयातील तरुणांचे गटच्या गट इथे मौज म्हणून आले होते. मेट्रो रेल्वे स्थानकातील दिशादर्शक फलक, तसेच सुटसुटीत रचनेमुळे लोकांना अडचण जाणवत नव्हती.
मेट्रोमध्ये गर्दी असूनही लोकांची तक्रार नव्हती. कारण वातानुकूलित डबे असल्याने उकाडा नव्हता. तसेच पटापट स्थानके येत होती. इतक्या कमी वेळेत पोहोचलो याचा प्रवाशांना सुखद धक्का बसत होता. घाटकोपरला रेल्वे स्थानकातच मेट्रोचे स्थानक असल्याने प्रवाशांना ते अधिक सोयीचे पडत होते. कुतूहलापोटी आलेले अनेक जण फोटो काढण्यात दंग होते.

आनंदीआनंद!
उमेर शरीफ – मी एमआयडीसीमध्ये एका मुलाखतीसाठी निघालोय. मेट्रोचा हा सुखद प्रवास लक्की ठरेल अशी अपेक्षा
ब्रिजेश शहा- दररोज मला विरारहून अंधेरीला यावं लागतं. तेथून मग रिक्षाने चकाल्याला ऑफिसला जावं लागतं. रिक्षा मिळत नाही आणि मिळाली तर मोठं भाडं द्यावं लागतं. शिवाय वेळ जातो तो वेगळा आता तर माझ्यासारख्या अनेकांची मस्त सोय झालेली आहे.
जुगल गांगर – वर्सोव्याहून थेट घाटकोपरला अवघ्या काही मिनिटात पोहोचता आलं ही कल्पनाच स्वप्नवत वाटते. आता या मार्गावर मासिक पास सुरू करायला हरकत नाही.
रेखा – मला महाविद्यालयात जाण्यासाठी चांगली सोय झाली आहे. आज मी कुटुंबीयांसमवेत या मेट्रोचा अनुभव घेतला.
सुनील – नोकरदार मध्यमवर्गीयांसाठी ही मेट्रो अत्यंत उपयुक्त आहे. या मेट्रोमुळे रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे. पावसाळयात होणारे लोकांचे हालही थांबतील.