मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून त्याचा प्रस्तावित खर्च एक हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील बहुप्रतीक्षित मेट्रो रेल्वेच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी पार पडले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प हा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. सल्लागाराचा अंतिम अहवाल आला की प्रकल्पाचे कामही लवकरच सुरू केले जाणार आहे. ८६८० कोटी रुपये खर्च यास प्रारंभी अपेक्षित होता. मात्र, आता तो एक हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ही संयुक्त कंपनी स्थापन झाली आहे. यासंबंधी सर्व कामासाठी रेल्वेचे अधिकारी दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. भूमी अधिग्रहणाचे काम यासोबतच होईल. हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका तसेच केंद्र व राज्य सरकार मिळून हा प्रकल्प पूर्ण करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.