वर्सोवा-घाटकोपर मेट्रो रेल्वे मार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम तसेच चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वेचा मागमूसही नसताना आता ही मेट्रो दहिसपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. शासनाकडे तशी मागणी करणारा प्रस्ताव धाडण्यात आला आहे. मात्र अद्याप शासनाकडून काहीही हालचाल झालेली नाही. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना यांनीच ही माहिती दिली आहे.
वाहतुकीची व्यवस्था अधिकाधिक सक्षम होणे, ही मुंबई महानगर प्रदेशाची सर्वात मोठी गरज असून वाहतुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्प हाच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे आग्रही मतही त्यांनी व्यक्त केले. आता मुंबईपेक्षा लगतच्या परिसरातील प्रकल्प राबवण्यावर प्राधिकरणाचा भर राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
चारकोप- वांद्रे- मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वेचे काम भूमिपूजन होऊन चार वर्षे उलटली तरीही अद्याप सुरूच झालेले नाही. या मार्गाच्या कार डेपोसाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा पर्यावरणीय परवानगीच्या कचाटय़ात सापडली आहे. हा मार्ग मार्गी लागण्यात अशा अडचणी असतानाच चारकोप ते दहिसर अशा वेगळ्या मेट्रो मार्गाचा विचारही नियोजनात आहेच. या पाश्र्वभूमीवर विद्यमान मानुखर्द ते चारकोप या मेट्रो मार्गाचा विस्तार दहिसपर्यंत करावा, व हा संपूर्ण एकच मेट्रो मार्ग असावा. तसे झाल्यास कारडेपोच्या जागेचा प्रश्न सुटू शकेल आणि प्रकल्प व्यवहार्य ठरेल, असा विचार आहे.
प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. प्राधिकरणाच्या विविध योजनांबाबतही त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मुंबई व महानगर प्रदेशातील दळणवळणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे प्रकल्प राबवण्याची खूप गरज आहे. प्राधिकरणाने हेच काम केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची गरज आहे. ऊर्जाप्रकल्प आदी इतर गोष्टी करण्यासाठी बाकीच्या संस्था आहेत, असे रोखठोक मत अस्थाना यांनी मांडले.
 खर्चात ६० टक्क्यांनी वाढ
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचा खर्च २३५६ कोटी रुपये होता. पण प्रकल्प रेंगाळल्याने आणि गाडय़ांची संख्या वाढवण्याने खर्चात वाढ झाली आहे. एकूण खर्च सुमारे ६० टक्क्यांनी वाढला असल्याचा अंदाज आहे. अर्थात ती जबाबदारी ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि’ची आहे, असे अस्थाना यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रो रेल्वेचा खर्च ३७०० कोटींच्या घरात गेल्याचे चित्र आहे.