बेसिन आहेत पण पाण्याचे नळ नाही, दिवा आहे पण विजेचा धक्का बसतो म्हणून त्याला हात लावण्यास बंदी आहे, ‘लेडीज रूम’ आहे, पण छप्पर कोसळल्याने तिला कुलूप आहे, स्वच्छतागृहांची अवस्था तर इतकी वाईट आहे की सार्वजनिक शौचालये परवडली.. ही दूरवस्था एखाद्या सरकारी कार्यालयाची नसून विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी प्रत्येकी लाखो रुपये मोजून घेणाऱ्या नवी मुंबईतील ‘एमजीएम अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालया’ची आहे.
नवी मुंबईतील कामोठे येथील हे महाविद्यालय राज्याचे एकेकाळचे शिक्षणमंत्री राहिलेले डॉ. कमलकिशोर कदम यांच्या ‘महात्मा गांधी मिशन’ या संस्थेचे आहे. या ठिकाणी अभियांत्रिकीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मिळून तब्बल ३,७०० विद्यार्थी शिकतात. एमजीएम अभियांत्रिकी अभ्यासक्रमापोटी दरवर्षी विद्यार्थ्यांकडून ८१ हजार रुपये मोजून घेते. पण, इतके शुल्क घेऊनही महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, लेडीज कॉमन रूम, विजेची जोडणी आदी मूलभूत सुविधांचा पार बोजवारा उडालेला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून शिवसेनाप्रणित ‘युवा सेने’च्या सिनेट सदस्य असलेल्या प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, माधव जगताप आणि रूपेश पाटील यांनी बुधवारी या महाविद्यालयाची पाहणी केली असता ही विदारक परिस्थिती समोर आली.
या महाविद्यालयात मुलामुलींची मिळून तब्बल आठ स्वच्छतागृहे आहेत. पण, त्यापैकी केवळ पाचच सुरू आहेत. इतर तीन दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहेत. पाचपैकीही केवळ दोनच स्वच्छतागृहे वापरण्याच्या लायकीची आहेत. उर्वरित स्वच्छतागृहांची अवस्था इतकी भीषण आहे की सार्वजनिक शौचालये परवडली. एकतर बहुतेक स्वच्छतागृहांमध्ये बेसिनला पाण्याचे नळच लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, पाणी नाही. स्वच्छतागृहांवर ‘पुरूष’ आणि ‘स्त्री’ असे साधे फलकही लावलेले नाहीत. त्यामुळे, कुठले स्वच्छतागृह कोणाचे याचा थांगपत्ताच लागत नाही. मुली जे स्वच्छतागृह वापरतात ते दारे-खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच, वाचनालयातील स्वच्छतागृह तुंबल्याने ते वापरात नाही. मुलींच्या कॉमन रूममधील छप्पर कोसळल्याने ते बंदच असते. संगणक कक्षातील विजेच्या जोडणीत दोष असल्याने तिथल्या बटनांना हात लावल्यानंतर विजेचा धक्का बसतो. इथल्या बटनांवर ‘हात लावू नका’ अशी सूचनाच या ठिकाणी लिहून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, हा संगणक कक्ष म्हणजे मुलांच्या जीवाशी खेळच आहे. मुलांकडून लाखो रुपयांचे शुल्क उकळल्यानंतर इतक्या वाईट सुविधा पुरविल्या जात असतील तर शुल्काचा पैसा जातो कुठे, असा सवाल राजन कोळंबेकर यांनी केला.
ं२ जानेवारीपर्यंत सर्व ठिकठाक करू
‘देखभालीच्या अभावी ही परिस्थिती उद्भवली असली तरी २ जानेवारीला महाविद्यालय सुरू होईपर्यंत आम्ही सर्व काम ठिकठाक करू. तसेच, या काही गोष्टी वगळता महाविद्यालयातील इतर सुविधा चांगल्या आहेत,’ अशी सारवासारव महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. नारायणखेडकर यांनी केली.