मुंबईत स्वस्त दरात हक्काचे घर देणारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘म्हाडा’च्या घरांकडे लाखो गरजूंचे डोळे लागलेले असतात. पण गेल्या काही वर्षांत ‘म्हाडा’च्या घरांची किंमतदेखील बिल्डरांच्या दराशी स्पर्धा करू लागल्याने ‘घर नको पण किंमती आवरा’ असे म्हणण्याची वेळ म्हाडाच्या घरांची लॉटरी लागलेल्यांवर आली आहे. घराची किंमत परवडत नसल्याने अनेक विजेत्यांनी मिळालेल्या घरावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
‘म्हाडा’ने गेल्या दोन वर्षांत सोडतीनंतर काही काळाने आपल्या घरांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे काही ठिकाणी १५ लाखांची घरे साडेसतरा लाखांची झाली. तर पवईतील उच्च उत्पन्न गटातील घरे थेट १५ लाखांनी महाग झाली. त्याचबरोबर सोडतीतच घसघशीत दर लावण्याचा प्रकारही ‘म्हाडा’ने सुरू केला आहे. त्यामुळे एरवी बिल्डरांच्या तुलनेत जवळपास निम्म्या किमतीत मिळणारी ‘म्हाडा’ची घरे आता जवळपास बाजारभावानेच मिळू लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ‘म्हाडा’ची घरे परवडेनाशी होत आहेत. अल्प उत्पन्न गटातील घरे १५ लाखांना तर मध्यम उत्पन्न गटातील घरे ३६ लाखांवर गेली आहेत.
यातूनच शिंपोली-कांदिवली आणि कुल्र्यातील विनोबा भावे नगर येथील अनेक यशस्वी अर्जदारांनी ‘म्हाडा’चे घर नाकारले आहे. ताबा देण्यासाठी ‘म्हाडा’ने त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणी केल्यावर अनेकांनी घर घेणे शक्य नसल्याचे सांगत त्यावर हक्क सोडत असल्याचे कळवले आहे. शिंपोलीतील २२ यशस्वी अर्जदारांनी छाननीसाठी कागदपत्रेच सादर केली नाहीत. तर १० जणांनी घराच्या आकाराच्या तुलनेत किंमत प्रचंड असल्याचे सांगत घर नाकारले आहे. या ना त्या कारणाने घर नाकारणाऱ्यांची संख्या ३८ आहे.यापूर्वीही प्रत्येक सोडतीनंतर काही यशस्वी अर्जदारांनी घर नाकारले आहे. पण इतक्या मोठय़ा प्रमाणात घर नाकारण्याची घटना प्रथमच घडली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. घर नाकारण्याचे कारण अनेकांनी दिले नसले तरी दराचा मुद्दाच त्यात असावा असेही ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.शिंपोलीत ‘म्हाडा’ने प्रति चौरस फूट तब्बल ११, ५८८ रुपयांचा दर लावला. स्थानिक पातळीवर खासगी बिल्डरांच्या घरांना सध्या सुमारे १२ हजार रुपयांचा दर सुरू आहे. त्यामुळे ‘म्हाडा’चे घर जवळपास बिल्डरांच्याच दराने मिळत असल्याने ते परवडणार नाही, अशी यशस्वी अर्जदारांची भावना झाली आहे.
खासगी बिल्डरांची घरे ही सुपर बिल्टअपनुसार विकली जातात. तर ‘म्हाडा’ चटई क्षेत्रानुसार विकते. त्यामुळे वरकरणी दर जवळपास समान वाटत असला तरी प्रत्यक्षात समान आकाराचे ‘म्हाडा’चे घर हे बिल्डरांच्या तुलनेत स्वस्त पडते, असाहा ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांचा दावा आहे.