‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे बांधण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित विरार येथील घरांसाठीची सोडत डिसेंबरमध्ये निघण्याची अपेक्षा आहे. विरार येथील ५४५१ घरे आणि सिंधुदुर्गमधील वेंगुल्र्यातील १५० घरांसाठी ही सोडत निघणार आहे.
कोकण मंडळातर्फे विरार येथील बोळिंजमध्ये अतिउंच इमारतीत घरे बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. गेल्या वर्षीच त्याचे संकेत ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी दिले होते. पण इतक्या उंच इमारतींना परवानगी देण्यावरून स्थानिक महानगरपालिकेत लवकर सहमती न झाल्याने प्रकल्प रखडला होता.
काही काळापूर्वी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे आता २२ ते २४ मजली अशा अतिउंच इमारतींमध्ये अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी ही घरे बांधण्यात येणार आहेत.
अल्प उत्पन्न गटात ३५९६ घरे असतील. तर मध्यम उत्पन्न गटातील १८५५ घरे या सोडतीत असतील. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या १४ मजली इमारत बांधण्याची परवानगी आहे. ‘म्हाडा’च्या योजनेसाठी ही मर्यादा शिथिल करायची असल्याने त्यावर आता सहमती झाली आहे. पण औपचारिक निर्णय आणि नियमांमधील बदल होणे व त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
नियमांमधील बदलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक-दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. नियमांचा अडथळा औपचारिकपणे दूर झाला आणि अतिउंच इमारतींना परवानगी मिळाली की घरांच्या सोडतीची तारीख ठरवली जाईल, असे कोकण मंडळाचे मुख्याधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
अल्प उत्पन्न गटातील घरांचे चटई क्षेत्रफळ हे ३३० चौरस फुटांचे असेल. तर मध्यम उत्पन्न गटातील घरांचे चटई क्षेत्रफळ हे ६४० चौरस फुटांचे असेल. सध्या बांधकाम खर्च २६०० रुपये प्रति चौरस फूट असा गृहीत धरण्यात आला असून घरांची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही, असेही या वेळी सांगण्यात आले.